पुणे । विज्ञानाच्या चमत्काराचा साक्षीदार होण्याचा बहुमान पुण्याला मिळाला आहे. गर्भाशय प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची समजली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये गर्भाशयाचं ट्रान्सप्लांटेशन यशस्वीरित्या पार पडले आहे. भारतात मात्र ते अद्याप यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे या शस्त्रक्रियेबद्धल भारतातील वैद्यकशास्त्रात कमालीची उत्सुकता होती. पुण्याच्या रुग्णालयात तीन महिलांच्या शरीरात त्यांच्या आईच्या गर्भाशयाचं प्रत्यारोपण केले जाणार आहे.
जगभरात आतापर्यंत गर्भाशय प्रत्यारोपणाच्या केवळ 25 शस्त्रक्रियाच पार पडल्या आहेत. त्यापैकी 10 महिलांना यशस्वी गर्भधारणा झाली आहे. स्वीडनमध्ये 2014 मध्ये पहिल्यांदा जगातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले. पुढील महिन्यात 13 आणि 14 मे या दिवशी पुण्यातील गॅलक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्टिट्यूटमध्ये हे प्रत्यारोपण केले जाणार असून, राज्य आरोग्य सेवा संचलनालयानेही जीएलसीआयला गर्भाशय प्रर्त्यारोपणाचा परवाना दिला आहे. हा परवाना पाच वर्षांसाठी असणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास तीनही महिलांना मातृत्वाचा आनंद घेता येणार आहे.
गर्भाशयासंबंधी असलेल्या काही कारणांमुळे अनेक महिलांना अपत्य प्राप्ती होत नाही. या कारणामुळे जगभरात तीन ते चार टक्के महिला मातृत्वाच्या आनंदापासून वंचीत राहतात. दरम्यान, या शस्त्रक्रियेमुळे अशा महिलांना मातृत्वाचा आनंद घेता येणार आहे. बंगळुरुच्या मिलान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थलाही दोन महिलांचे गर्भाशय प्रत्यारोपण करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाली आहे.