पुणे-पायामध्ये स्लीपर आणि अंगात शॉर्ट्स घातली म्हणून हॉटेल व्यवस्थापकाने आयटी इंजिनीयर्सना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक हॉटेलात हा प्रकार घडला.
पुण्यात एका आयटी कंपनीत कामाला असणारे काही संगणक अभियंते सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवर्समधील ‘एजंट जॅक’ या हॉटेलात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मंगळवारी रात्री ११ वाजता गेले होते. त्यावेळी पायामध्ये स्लीपर आणि अंगात शॉर्ट्स घातल्याचे कारण पुढे करून सर्वजणांना हॉटेल व्यवस्थापनाने चक्क प्रवेश नाकारला. या मुद्द्यावरून त्यांनी हॉटेलच्या संचालकांशी संवाद साधला असता त्यांनी रिसेप्शन लॉबीमध्ये लिहिलेल्या नियमावलीकडे बोट दाखवले. एवढेच नाही तर ‘तुमचा अपिरियन्स या हॉटेलमधील कोणतीही सेवा घेण्यास योग्य नाही’ असे सांगितले असा आरोप या संगणक अभियंत्यांनी केला आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना संगणक अभियंता विराज मुनोत म्हणाले ” हॉटेल संचालकांची ही वर्तणूक मुळातच घटनाबाह्य असून अशा प्रकारचे खासगी नियम म्हणजे मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहेत. त्यामुळे या घटनेची नोंद गुन्हा म्हणून व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे” विशेष म्हणजे हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या नियमावलीमधील अनेक नियमांपैकी असाही एक नियम लिहिला आहे की या ठिकाणी बॉलिवूड मधील हिंदी गाणी वाजवली जात नाहीत.