पुणे : प्रतिनिधी – पुण्यातील अठरा वर्षीय तरुणी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असून ती सध्या काश्मीर खोर्यात वास्तव्यास असून घातपात करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने दिली. दीड वर्षांपूर्वी पुण्यातील येरवडा परिसरातील एक मुलगी सोशल मीडियाद्वारे आयसिसच्या संपर्कात आली होती. ही तीच मुलगी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान पोलिसांनी येरवडा परिसरातील या मुलीच्या आईशी विचारपुस केली असता टी मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असून ती कुठल्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात नसल्याचे सांगितले. परंतु ती कुठे आहे याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला, अशी माहिती पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.
यापुर्वी मतपरिवर्तन केले होते
ही मुलगी बंडगार्डन परिसरातील नामांकित शाळेत शिक्षण घेत असताना अचानक तिच्या राहणीमानात आणि पोषाखात बदल झाला होता. आधुनिक कपड्यात वावरणारी मुलगी अचानक पारंपरिक पोषाखात वावरू लागल्याने कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी दहशतवादविरोधी पथकाला याची कल्पना दिली. या पथकाने केलेल्या चौकशीत ती सिरीयातील आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर कुटुंबीयांनी मौलवीच्या मदतीने तिचे मन परिवर्तन केले होते. तिने यानंतर दहशतवाद्यांच्या संपर्कात राहणार नसल्याचे सांगितल्याने तिच्यात सुधारणा झाली असे सर्वांना वाटले होते.
आईने माहिती न दिल्याने संशय
परंतु तीच मुलगी काश्मीरमध्ये असून घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून आम्हाला समजली, असे सह आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता आई तिच्याविषयी माहिती देत नसल्यामुळे अद्याप तिचा ठाव ठिकाणा पोलिसांना माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.