पुण्यातील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर

0
अनधिकृत होर्डिंग्जवर तातडीने काढून टाका
विविध संस्थांनी निवेदनाद्वारे केली मागणी
पिंपरी : पुणे शहरातील मालधक्का चौकातील अनधिकृत होर्डिंग्ज पडल्यामुळे चार निरपराध व निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला. अनेक नागरिक जखमी झाले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरामध्येही शेकडोंच्या संख्येने अनधिकृत होर्डींग्ज व हजारो बेकायदेशीर फ्लेक्स बिनदिक्कत उभे आहेत. तरी शहरातील अनाधिकृत होर्डिंग्ज व अनधिकृत फ्लेक्सवर तातडीने कारवाई करून, ती काढून टाकावी, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पु÷ण्यातील दुर्घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. भर वर्दळीच्या चौकामध्ये ही दुर्घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. होर्डिंग्ज उभारणीसाठी भरपूर पैसा महापालिकेला मिळत असतो. त्या पैशांच्या मोबदल्यात नागरिकांचा जीव दावणीवर लावला जातोय.
हितसंबंधांमुळे कारवाई नाही
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व होर्डींग्ज व फ्लेक्सना राजकीय वरदहस्त असतो. त्यामुळे संबंधित ठेकेदार, लोक प्रतिनिधी व पालिकेतील अधिकारी यांच्यातील ‘आर्थिक’ हितसंबंधांमुळे प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. पुण्यातील दुर्दैवी घटना घडल्यानंतर लगेच महापालिकेच्या ‘आकाशचिन्ह परवाना विभागा’ला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचा कांगावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु आत्तापर्यंतचा अनुभव पाहता या बाबतीत कुठलीही कारवाई न होण्याचीच शक्यता अधिक आहे. बीपीएमसी कायद्यानुसार अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डींग्ज व फ्लेक्सवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची आयुक्तांची इच्छा तीव्र असेल तरच प्रामाणिकपणे अशी कारवाई होऊ शकते. आपल्या महानगरपालिकेमध्ये काही ठराविक ठेकेदारांकडेच या कामांची मक्तेदारी मागील अनेक वर्षांपासून कायम ठेवली गेली आहे. त्यामुळे त्यांचे अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर हितसंबंध निर्माण झालेले आहेत.
शिस्तभंगाची कारवाई करावी
पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्येही कधीही घडू शकते. आपल्या शहरात अशी दुर्घटना घडण्याची वाट आपण पाहू नये. यासंदर्भात तातडीने कारवाई करून शहरातील नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी महापालिका प्रशासन गंभीर आहे. असा संदेश जनतेमध्ये जाण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना निर्गमित करावेत. अशी कारवाई करण्यास हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूदही करण्यात यावी. अन्यथा शहरात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास पालिका प्रशासन व प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण व्यक्तिश: जबाबदार राहाल याची गांभीर्याने दखल घ्यावी. या निवेदनांवर मानव कांबळे, प्रदीप पवार, दिलीप काकडे, गिरीधारी लढ्ढा, उमेश इनामदार, अशोक मोहिते यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.