पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर पाडणार

0
पुणे : सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडून तिथे बहुमजली रंगमंदिर संकुल उभारण्यात येणार आहे. सध्याचे रंगमंदिर पाडून तिथे नव्या संकुलाच्या उभारणीसाठी महापालिकेने वास्तुविशारदांकडून आराखडे मागविले आहेत. बालगंधर्व रंगमंदिरानजीक मेट्रो मार्ग होत आहे त्यामुळे रंगमंदिराबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच सत्ताधारी भाजपने सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरवून बालगंधर्व रंगमंदिराच्या जागी अत्याधुनिक बहुमजली रंगमंदिर संकुल उभे करण्याचे ठरविले. याकरिता महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात १० कोटींची तरतूद केली आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगमंदिराची उभारणी झाली आणि बालगंधर्व यांच्या हस्ते दि.८ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन करण्यात आले . दि. २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उदघाटन करण्यात आले. पुलंच्या जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे आणि या वर्षातच त्यांनी साकारलेली वास्तू पाडण्यास कला क्षेत्रातून विरोधाची शक्यता आहे.