भोसरी । शहरातील वाढत्या प्रदूषणाची समस्या गंभीर होत असताना पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करणे गरजेचे आहे. ईथेनॉलचा वापर केल्यास वाहतूक व्यवस्था नफ्यात येईल. पिंपरी-चिंचवड, पुणे शहराच्या आजुबाजूला साखर कारखाने आहेत. त्यामुळे ईथेनॉल सहज उपलब्ध होऊ शकते. त्याचा वापर करुन पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील बसेस ईथेनॉलवर चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. नाशिक फाटा, भोसरी येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन शुक्रवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रत्येक जिल्ह्यात रोड समितीची स्थापना करणार
यावेळी बोलताना ना. गडकरी म्हणाले, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगामी काळात मिथेनॉल, इथेनॉल, बायोगॅस, वीज यांचा पर्यायी इंधन म्हणून प्रभावीपणे वापर करता येईल. तसे झाल्यास शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. देशात दोन हजार ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची स्थापना करण्यात येणार आहेत. देशात 22 लाख वाहनचालकांची कमतरता आहे. देशातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सीआयआरटीे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर प्रोजेक्ट तयार करावेत. त्यासाठी लागेल तेवढा पैसा द्यायला केंद्र सरकार तयार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात खासदारांच्या अध्यक्षतेखाली रोड समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकार्यांचा सहभाग असणार आहे. या समितीने हद्दीतील महामार्गाची पाहणी करायची आहे. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पर्याय सांगणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.
कार्यक्रमाला माननियांची उपस्थिती
यावेळी महापौर नितीन काळजे, सीआयआरटीचे कॅप्टन राजेंद्र साने-पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
देशाभरातील बस स्थानके अत्यंत खराब आहेत. बस स्थानके सुसज्ज, अत्याधुनिक सुविधांनीयुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विमानतळासारखी बस स्थानके करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. चांगले काम करणार्यांचा सन्मान होत नाही आणि चुकीचे काम करणार्यांना शिक्षा होत नाही. मग ते कोणतेही सरकार असो. ही सरकारची मोठी समस्या आहे.
– ना. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंधारण मंत्री