पुण्यातील महिलेचा नगरमध्ये बुडून मृत्यू

0

पुणे । औरंगाबाद रोडवरील घोडगावात असलेल्या मुळा कालव्यात एका महिलेचा मृतदेह बुधवारी तरंगता आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. अश्विनी अजय मुळे (वय 22, रा. पुणे) असे तिचे नाव आहे. साईंच्या दर्शनासाठी ती पतीसोबत शिर्डीला गेली होती. तेथून परतत असताना कॅनॉलजवळ तिचा पाय घसरला, असा दावा पतीने केला आहे.

कठ्यावर बसण्याच्या प्रयत्नात गेला तोल
अश्विनी गृहिणी असून तिचा पती अजय जिममध्ये इस्ट्रक्टर म्हणून काम करतो. चार वर्षांपूर्वी त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दोघे शुक्रवारी दुपारी हडपसरहून बसने शिर्डीला गेले. दोन दिवस त्यांनी तेथेच मुक्काम केला. सोमवारी सकाळी ते शनिशिंगणापूरला गेले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दर्शन आटोपून ते घोडेगावात आले. फिरण्यासाठी ते कॅनॉलच्या पुलावर ते गेले होते. अश्विनी पुलाच्या कठड्यावर चढून त्यावर बसायला लागली असता तिचा तोल जाऊन ती खाली पडली.

48 तासांनंतर सापडला मृतदेह
अश्‍विनी कॅनोलमध्ये पडताच अजयने आरडा-ओरड सुरू केला. स्थानिकांनी पोलिसांना बोलावले होते. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास अश्विनी कॅनॉलच्या पाण्यात पडली होती. बुधवारी दुपारी तिचा मृतदेह भेंडे शिवारात कॅनॉलमध्ये तरंगताना आढळला. पाण्यात बुडून अश्विनीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनई पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.