मुंबई : कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला अटक करण्यात आली आहे. मोजोचे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासोबतच एका मॅनेजरविरोधातही सदोष मनुष्यवधाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. युग पाठक हा पुण्याचे माजी पोलिस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आहे.
मोजोच्या अडचणी वाढल्या
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा युग पाठक, डुक थुली, प्रितीना श्रेष्ठ आणि सौमित श्रृंगारपूरे हे या पबचे मालक आहेत. आरोपींमध्ये या पैकी कोणाचा समावेश आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मोजोच्या मालक व संचालकांविरोधात यापूर्वी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यातील (एमआरटीपी) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने मोजोच्या अडचणी वाढल्या आहेत.
14 जणांचा गेला होता बळी
कमला मिलमध्ये मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या पबमध्ये 29 डिसेंबर रोजी रात्री भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. वन अबव्हमध्ये प्रथम आग लागली आणि नंतर ही आग पसरत मोजो बिस्ट्रोमध्ये गेल्याचा प्राथमिक अंदाज होता. यानुसार पोलिसांनी वन अबव्हच्या मालक आणि मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी अग्निशमन दलाने महापालिका आयुक्तांना अहवाल दिला होता. यात मोजोच्या दक्षिण पूर्वेकडील भागात हुक्क्यामधील ठिणगीमुळे पडद्यांनी पेट घेतला आणि छतापर्यंत गेलेल्या आगीने वन अबव्हलाही वेढले, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. पबमध्ये उपस्थित असलेले ग्राहक, इमारतीतील सुरक्षारक्षक तसेच घटनास्थळी पहिल्यांदा पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान यांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळाची पाहणी या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला होता.
पडद्यांनी पेट घेतला
मोजोच्या दक्षिण पूर्व भागात आगीची तीव्रता जास्त होती. तेथील जमिनीवरील लाद्यांचेही आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडद्यांनी पेट घेतला व त्यानंतर छतापर्यंत आग पोहोचली. दक्षिण बाजूला आग पसरवणार्या वस्तू नव्हत्या. मात्र, छतावाटे आग सर्वत्र पसरली, असे अहवालात म्हटले होते. मोजोच्या गच्चीमध्ये छप्पर नसलेल्या ठिकाणी बार होता. येथेच बार टेण्डरकडून आगीचे खेळ सुरू होते. मात्र, ही जागा आगीने पेट घेतलेल्या पडद्यापासून दूर होती, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.