आयपीएल : सामन्यांसाठी सरकारने पाणी देऊ नये : उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई : आयपीएलच्या 11 व्या सत्रातील पुण्यामध्ये होणार्या सामन्यांवर ‘जलसंकट’ कोसळले असून, पुण्यात होणार्या आयपीएलच्या सामन्यांसाठी राज्य सरकारने पाणी देऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पुण्यातील सामने होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
पवना धरणाचे पाणी देण्यास मनाई
तामिळनाडूत सुरू असलेल्या कावेरी पाणीवाटपाच्या वादावरून चेन्नईत होणारे ‘आयपीएल’चे सामने रद्द करण्यात आले असून, हे सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार होते. पुण्यात होणार्या या सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार?, असा यापूर्वी सवाल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला विचारला होता. एवढेच नव्हे तर यावर आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेशही खंडपीठाने असोसिएशनला दिले होते. त्यानंतर पुण्यातील गहुंजे स्टेडियमकडे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा 32 दिवस पुरेल इतका स्वत:चा पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे आयपीएलसाठी बाहेरुन पाणी घेण्याची गरजच नाही असा दावा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केला. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने पुढील निर्देश देईपर्यंत पवाना धरणाचे पाणी वापरण्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मनाई केली आहे.
मुंबई पालिका जादादराने पाणी देणार!
महाराष्ट्रात होणार्या आयपीएल सामन्यांना अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला विरोध दर्शवत एका संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुंबई महापालिकेने पुढील पाच वर्षे आयपीएलसाठी अतिरिक्त पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, वानखेडे स्टेडियमला आयपीएलसाठी आवश्यक असल्यास पाणी देण्यास मुंबई महापालिकेने होकार दर्शविला आहे पण हे पाणी जादा दराने विकत घ्यावे लागणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वकिलांनी खंडपीठासमोर दिली.