पुण्यातून लोकसभेसाठी मी इच्छुक – अनंत गाडगीळ

0

पुणे – आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढविण्यासाठी मी इच्छुक आहे असे काँग्रेस पक्षाचे आमदार अनंत गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुणे शहर काँग्रेस पक्षातर्फे प्रदेश समितीकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी पाच जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये गाडगीळ यांच्या नांवाचा समावेश आहे. आपल्या उमेदवारीमागील भूमिकेबद्दल गाडगीळ म्हणाले ‘मी पक्षशिस्त मानणारा कार्यकर्ता आहे. लोकसभा उमेदवारीसाठी फलकबाजी करणारा मी नाही. सन २००४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी माझ्या नांवाचा विचार केला होता. तेव्हाही मी पक्षशिस्तीनुसार वागलो. पक्षाने ज्या-ज्या जबाबदाऱ्या मला दिल्या त्या-त्या मी योग्यप्रकारे पार पाडल्या आहेत. काँग्रेस पक्षात मी चाळीस वर्षे काम करीत असल्याने ते काम कसे चालते ते मला माहीत आहे. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. विधीमंडळातील माझे काम मी पुणेकरांपर्यंत पोहोचवत आहेच शिवाय पुणे कँन्टोन्मेंट, खडकी कँन्टोंन्मेंट येथे कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, भेटीगाठी घेतल्या. पुण्यातील अल्पसंख्य, दलीत समाजात गाडगीळ घराण्याविषयी आस्था आहे. ते पाठबळ माझ्यामागे राहील’.

लोकसभा उमेदवारीविषयी स्वतः गाडगीळच आज बोलल्यामुळे काँग्रेस पक्षातील उमेदवारीची स्पर्धा अधिकच चुरशीची झाल्याचे मानले जाते. अनंत गाडगीळ यांचे वडील विठ्ठलराव आणि आजोबा काकासाहेब हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. केंद्र सरकारमध्ये ते मंत्रीही होते. हाच धागा पकडून दिल्लीच्या राजकारणात अधिक स्वारस्य असल्याचे अनंतराव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सूचित केले.

राजस्थान, मध्यप्रदेश मध्ये भाजपच्या विरोधात निकाल गेल्यास दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपच्या पक्षनेतृत्त्वाविरोधात भाजपमधूनच उठाव होईल असे भाकीत गाडगीळ यांनी केले. भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता असून त्यांच्या खाजगी बोलण्यांमध्ये ही अस्वस्थता डोकावते असे गाडगीळ यांनी सांगितले.