पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाचा मुहूर्त गाठत पुणे पोलीस आयुक्तालयाकडून गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी फौजदार, शिपाई, नाईक आणि हवालदार या पदावरील 1669 कर्मचारी वर्ग केले आहेत. स्वातंत्र्यदिनी शहरात सुरू झालेल्या आयुक्तालयास मनुष्यबळ अपुरे पडू लागल्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून दुसर्या टप्प्यात हे वर्गीकरण झाले आहे.
हे देखील वाचा
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन करताना पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून 1855, तर पुणे ग्रामीणकडून 352 जणांचे मनुष्यबळ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्याचे निश्चित आले होते. शहरात स्वतंत्र आयुक्तालय सुरू होण्याच्या आदल्या दिवशी रात्री पोलिसांच्या बदलीचे आदेश काढले होते. हा मुद्दा वादग्रस्त झाला होता. मात्र त्यावर पुन्हा समन्वयाने निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकरिता सहायक फौजदार 143, पोलीस हवालदार 375, पोलीस नाईक 420 आणि पोलीस शिपाई 731 असे एकूण 1669 जणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पोलिसांची संख्या वाढल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कामकाजाचे नियोजन करणे सोईस्कर होणार आहे.