पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपने हस्तक्षेप केल्याचा आरोप करत शहरात इव्हीएम मशीनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये भाजप वगळता सर्व पक्षांचे पराभूत उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. माजी नगरसेवक शंकर केमसे, दत्ता बहिरट,बाळासाहेब बोडखे, राजू पवार, धनंजय जाधव, सुशीला नेटके, अस्मिता शिंदे, अर्चना कांबळे आदींसह पराभूत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुणे महापालिकेच्या निकालांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र त्यानंतर पराभूत उमेदवारांनी भाजपने मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कारणासाठी 200 उमेदवार न्यायालयात जाणार असल्याचे यापुर्वीच जाहीर करण्यात आले होते. याच कारणासाठी मंगळवारी झाशीची राणी चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने या मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. मोर्चामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. ही प्रतीकात्मक अंत्ययात्रा वैकुंठपर्यंत नेण्यास पोलिसांनी नकार दिल्याने जंगली महाराज रस्त्यावर प्रतीकात्मक इव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले.
भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी
जंगली महाराज रस्त्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आहे. या कार्यलयाजवळून मोर्चा जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.