काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत शिलेदार गमविला : पुणे शहर जिल्हा काँग्रेस
अंत्यदर्शनासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रिघ
पुणे : डॉ. पतंगराव कदम यांनी अनेक कठिण समस्यांना तोंड देऊन आपले शिक्षण पूर्ण केले आणि संपूर्ण देशात भारती विद्यापीठ संस्थचे नाव उंचावले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली. काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेल्या अनेक मोठमोठ्या जबाबदार्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत शिल्पकार गमविला, अशा शब्दात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय विद्यापीठ परिसरात स्व. कदम यांचे पार्थिव आणताच अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
पतंगराव कदम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अतिशय गरिबीतून त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक साम्राज्य उभे केले. त्यामागे त्यांची कामावरील अविचल निष्ठा दिसून येते. इतके मोठे साम्राज्य उभे करून ते अत्यंत साधे होते. सर्वांशी प्रेमाने वागायचे. अत्यंत मिनमिळावू असलेल्या या नेत्याच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– खा. वंदना चव्हाण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधनाच्या बातमीने धक्का बसला. पक्ष जरी वेगळा असला तरीही अनेक वर्षांपासून आम्ही विधानसभेत एकत्र काम करत होतो. अनेक विषयांवर त्यांनी विधानसभेत अभ्यासू भाषण केली. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. महसूल, उद्योग, सहकार, वन, मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी राज्यात उत्तमरित्या काम पाहिले. त्यांच्या जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाली असून, राजकारणातील एक अभ्यासू नेतृत्व हरपले.
– गिरीश बापट, पालकमंत्री
डॉक्टर पतंगराव कदम ह्यांच्या मृत्यूने महाराष्ट्र एका जाणकार आणि अभ्यासू, कर्तृत्ववान नेत्याला मूकला आहे. लहाणपणापासुनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अत्यंत सामान्य परिस्थितीतून ते मोठे झाले. शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा सर्व क्षेत्रात ते यशस्वी झाले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले.
– अनिल शिरोळे, खासदार