पुणे : शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान दरीत मृतदेह आढळून आले आहे. विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२, रा. कात्रज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी नोंदविण्यात आली होती.
दरम्यान हत्येमागे हात असलेल्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा शिरसाट यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावरून सरकारला लक्ष केले आहे. राज्यात गुन्हेगारी फोफावत आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. सत्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना ही अशी किंमत का मोजावी लागते? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. गुन्हेगारी फोफावतेय. अन्यायाविरोधात वाचा फोडणाऱ्यांना, सत्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना ही अशी किंमत मोजावी लागणार का? @CMOMaharashtra उत्तर द्या?
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 12, 2019