पुण्यात रंगणार शरीरसौष्ठवपटूंचा कुंभमेळा

0

पुणे । देशातील 41 राज्य आणि संस्थामधील सुमारे 600 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेली राष्ट्रीय अजिंक्यपदाची शरीरसौष्ठव स्पर्धा 23 ते 25 मार्च दरम्यान पुण्यातील बालेवाडीमध्ये रंगणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे शरीरसौष्ठवपटू एकाच व्यासपिठावर येणार असून त्यातील 400 शरीरसौष्ठवपटू मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याची मान्यता असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन पुन्हा एकदा शरीरसौष्ठवाच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद अवघ्या विश्‍वाला दाखवून देणार आहे. काही वर्षांपूर्वी संघटनात्मक वादामुळे कमकुवत झालेला हा खेळ आता खर्‍या अर्थाने बलशाली झाला आहे. 600 पैकी सुमारे 400 खेळाडू मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळणार आहेत. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही खेळाडूंचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल. पण फिजीक स्पोर्टस् प्रकारातही खेळाडूंची संख्या विक्रमी असेल. यात देशभरातील सर्व मुख्य राज्य आणि संस्थांमधील बाहुबली शरीरसौष्ठवपटू पुण्यात खेळणार आहेत. त्यामुळे बालेवाडीत शरीरसौष्ठवाचे युद्ध रंगणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. पुण्याच्या बालेवाडीत भारत श्री स्पर्धेचे आयोजन म्हणजे आयबीबीएफसाठी फार मोठे आव्हान होते. ते आव्हान चेतन पाठारे यांच्या नेतृत्वाखाली आयबीबीएफने पेलले आहे.

खर्चाबाबत कुठेही आखडता हात न घेता आयबीबीएफने प्रथमच सर्व खेळाडू-पदाधिकार्‍यांची निवास आणि भोजन व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. आर्थिक संकटांमुळे प्रायोजकांनी पाठ दाखवल्यामुळे भारत श्रीचे आयोजन संकटात सापडले होते तेव्हा शरीरसौष्ठवाचे खरेखुरे संघटकच आयबीबीएफच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खुद्द व्यायाममहर्षी मधुकर तळवलकरांनी खेळाडूंच्या निवासासाठी फाइव्हस्टार व्यवस्थाच करावी, हा आग्रह धरला आणि तो पूर्णही करून दाखवला. त्यांच्याप्रमाणे ठाण्याचे प्रशांत आपटे आणि मुंबईचे अजय खानविलकर यांनीही भारत श्रीसाठी आपली आर्थिक ताकद आयबीबीएफच्या मागे उभी केली. एवढेच नव्हे तर यांचे सहकार्य पाहून शरीरसौष्ठवाच्या अनेक पदाधिकार्‍यांनीही स्पर्धेच्या ऐतिहासिक आयोजनासाठी आर्थिक बळ दिल्याची माहिती पाठारे यांनी दिली.

एकापेक्षा एक तगडे खेळाडू
यंदा स्पर्धेत अनेक विक्रम घडणार आहेत. महाराष्ट्राचा सर्वात मोठा संघ भारत श्रीसाठी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे 44 खेळाडूंच्या संघाने स्पष्ट दिसतेय,पण महाराष्ट्रापुढे आव्हान असेल रेल्वे, सेनादल, पंजाब,उत्तर प्रदेश, तामीळनाडूसारख्या तगड्या संघाचे. भारताचे सर्व स्टार खेळाडू या स्पर्धेसाठी गेले तीन महिने तयारी करीत आहेत. जेव्हा खेळाडूंची नावे सर्वांसमोर येतील ,तेव्हा शरीरसौष्ठव प्रेमींची छाती अभिमानाने फुगेल. रामनिवास, यतिंदर सिंग, जावेद खानसारखे दिग्गज या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे सलग दोनवेळा भारत श्रीचा मान मिळविणार्‍या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखणे फार आव्हानात्मक असेल, असेही शेवटी पाठारे यांनी सांगितले.

50 लाखांची रोख बक्षीसे
अनंत अडचणीनंतरही राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे संस्मरणीयच होणार असून देशभरातून येणा़र्‍या खेळाडूंवर 50 लाख रूपयांच्या रोख बक्षीसांचा वर्षावही होणार. 600 पेक्षा अधिक खेळाडू आणि 50 लाखांची रोख बक्षीसे हा एक विक्रमच आहे. शरीरसौष्ठवाची ताकद आणि केझ किती वाढली आहे, याचे रूप पुण्याच्या बालेवाडीत जागोजागी दिसेल, असा विश्‍वासही पाठारे यांनी बोलून दाखविला. खेळाच्या इतिहासात 600 खेळाडू आणि 400पदाधिकाऱयांची पंचतारांकित निवास आणि भोजन व्यवस्था करणारी आयबीबीएफ ही भारतातील पहिलीच क्रीडा संघटना असावी, असा दावाही पाठारे यांनी केला.