पुण्यात संगणक अभियंत्यांच्या आत्महत्या वाढत्या

0

पुणे । आयटी क्षेत्रात आकर्षक पगार आणि पॅकेज असतानाही कौटुंबिक कलह, नैराश्य, बेरोजगारी, तणावपूर्ण जीवन, योग्य संवादाचा अभाव आदी कारणातून निर्माण झालेल्या परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. अशाप्रकारच्या आत्महत्यांचे प्रमाण अलिकडे वाढत वाचलल्याचे चिंताजनक निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.

गोळी झाडून आत्महत्या
वाकड भागात आनंद यादव या अभियंत्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यादव यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता, त्यामुळे ते नैराश्यात होते आणि या नैराश्यातून ही आत्महत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसात आयटी क्षेत्रात काम करणार्‍या अभियंत्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. आकर्षक पगार असतानाही नोकरी तसेच व्यवसायातील ताणतणाव, गृहकलह, बदलती जीवनशैली, कंपनीत कामाचे निर्धारित केलेले टार्गेट इत्यादी कारणांमुळे आयटी अभियंत्यांमध्ये कायम तणाव असल्याचे दिसून येते.

2017मध्ये अनेक घटना घडल्या
17 मे 2017 मध्ये रहाटणीत निनाद पाटील या अभियंत्याने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. 2 एप्रिल 2017 मध्ये पिंपळे गुरव येथे राहणार्‍या जीशन शेख या अभियंत्याने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले होते. 17 मार्च 2017 ला दिघी येथे राजू तिवारी या अभियंत्याने विषप्राशन करून आत्महत्या केली होती. 3 फेब्रुवारी 2017 ला हिंजवडीतील अभिषेक यादव या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. केवळ पिंपरी-चिंचवड शहरातच नव्हे तर पुण्यातही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.