दिल्लीला दररोज धावणारी एकही थेट रेल्वे नाही
पुणे : दोन महानगरांमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे असते. पुणे हे देशातील सातवे महानगरीय शहर (मेट्रो सिटी) असून, सांस्कृतिक राजधानी आहे. असे असूनही पुण्याहून दिल्लीला दररोज धावणारी एकही थेट रेल्वे नाही. पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदाच धावत असून, तीही दिल्लीपर्यंत जात नाही. दिल्लीच्या अलीकडे असणार्या हजरत निजामुद्दीन या स्थानकापर्यंतच ती धावते. तर झेलम एक्स्प्रेस दिल्लीमार्गे जम्मू तावी येथे दररोज जाते. परंतु, ती पुणे-दिल्लीदरम्यान थेट धावत नाही.
दरम्यान, पुणे मार्गे (व्हाया पुणे) दिल्लीसह उत्तर भारतात अन्य ठिकाणी जाणार्या एकूण 7 गाड्या आहेत. परंतु, त्यातील दररोज धावणारी एकही रेल्वे नाही. गोवा एक्स्प्रेस, हुबळी-लोंडा-दिल्ली गोवा लिंक एक्स्प्रेस, कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाड्या पुणे मार्गे दिल्लीला जातात. मात्र, दक्षिणेकडून पुण्याला येईपर्यंत त्या तुडुंब भरून येत असल्याने पुणेकरांना या गाड्यांचा काहीच लाभ होत नाही.
पुण्याहून दिल्लीला दररोज हजारोंच्या संख्येने जाणारे प्रवासी आहेत. संसद, सरकारी कार्यालये, पर्यटन या गोष्टींमुळे कायमचा दिल्लीकडे ओढा असतो. शिवाय अनेक दिल्लीकरही कामानिमित्त पुण्यात येत असतात. अशांना रेल्वेशिवाय अन्य स्वस्त पर्याय नाही. परंतु, थेट रेल्वे दररोज नसल्याने त्यांची गैरसोय होते.
दुरांतो दररोज सोडण्याची मागणी
पुण्याहून दिल्लीजवळील हजरत निजामुद्दीन येथे जाणारी दुरांतो एक्स्प्रेस दिल्लीपर्यंत वाढवावी; तसेच आठवड्यातून दोनदाच धावणारी ही गाडी दररोज सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ही गाडी दररोज सुरू केल्यास हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. दरम्यान, नुकतेच मध्य रेल्वेवरील मुंबई सीएसएमटी-दिल्लीदरम्यान राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पश्चिम रेल्वे मार्गावर यापूर्वी राजधानी, शताब्दी धावत होत्या. मात्र, मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथून ती सुरू केल्याने 28 वर्षांपासूनची प्रवाशांची प्रतीक्षा पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यातून दुरांतोदेखील दररोज सोडण्यात यावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.