पुण्याला हक्काचे १६ टीएमसी पाण्यासाठी काँग्रेसने केले भजन आंदोलन

0
गणराया, पालकमंत्री बापटांना सुबुद्धी दे – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : पुण्याला हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरासमोर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी भजन आंदोलन केले. पुणेकरांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी गणराया पालकमंत्री गिरीष बापट याना सुबुद्धी दे, असे साकडे मोहन जोशी यांनी घातले.
पुण्यात सत्ताधारी भाजपच्या अकार्यक्षम कारभारामुळे नागरिकांना हक्काच्या १६ टीएमसी पाण्याला मुकावे लागत आहे. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही पुणेकरांना पाणीकपात लादणाऱ्या सरकारचा जोरदार निषेध यावेळी करण्यात आला. अतिशय अभिनव असे भजन आंदोलन करून या समस्येकडे काँग्रेसच्या वतीने नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. हे गणराया सिद्धी विनायका, आमच्या हक्काचे पाणी मिळू दे, तुला सर्व पुणेकर नमन करून विनंती करतो,हे गणराया पालकमंत्र्यांना सुबुद्धी दे, हे गणराया पाण्याचे संकट टळू दे !, रघुपती राघव राजाराम,पतित पावन सीताराम, गिरीश बापट को सद्बुद्धी दे भगवान, विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल,पाणी पाहिजे जय हरी विठ्ठल,बापटांना बुद्धी द्या, जय हरी विठ्ठल. अशी पुण्याच्या पाणीटंचाईकडे लक्ष वेधणारी व पालकमंत्री गिरीश बापटांना सद्बुद्धी देण्याची मागणी करणारी भजनं यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गायली. नागरिकांचा उत्स्फूर्त आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.
उपनगरांमध्ये अघोषित पाणी कपात आतापासूनच लागू केली आहे अशा तक्रारी आंदोलनानंतर मोहन जोशी याना भेटून महिलांनी केल्या. पुण्याच्या हक्काचे पाणी मिळण्यात पालकमंत्री बापट यांचे राजकारणच अडसर ठरत आहे. अन्य कुठल्याही भागाच्या विरोधात आम्ही नाही तर पुण्याला हक्काचं पाणी मिळावं हि आमची मागणी आहे. हि मागणी पूर्ण करता येत नसेल तर पालकमंत्र्यांनी आणि भाजपच्या आमदारांनी पदाचे राजीनामे दिले पाहिजेत. अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना केली. पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा पुरेसा उपलब्ध असतानाही पाणीकपातीचा तोंड द्यावे लागणे हे पुणेकरांवर अन्याय करणारे आहे असे जोशी यांनी सांगितले .
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामध्ये आमदार अनंतराव गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमलताई व्यवहारे,शांतीलाल सुरतवाला, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सोनाली मारणे, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, नगरसेविका सुजाता शेट्टी, सदानंद शेट्टी, विकास लांडगे, माजी नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेविका नीता रजपूत, बुवा नलावडे, जयसिंग गोंधळे, बाळासाहेब अमराळे, प्रकाश पवार, सुनील पंडित, शेखर कपोते, चेतन अग्रवाल, अयुब पठाण, बबलू कोळी, काका धर्मावत, राजीव शिरसाठ, रमेश सकट, उस्मान तांबोळी, चित्राताई माळवे, स्वाती शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता तिवारी यांनी केले, सुत्रसंचालन प्रशांत सुरसे यांनी तर आभार प्रवीण करपे यांनी मानले. श्री कसबा गणपतीची महाआरती करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. या अभिनव आंदोलनाची चर्चा पुणेकर नागरिकांमध्ये होती..