पुण्यावरचा दावा राष्ट्रवादीने सोडला नाही

0
अजितदादांच्या वक्तव्याने पुन्हा ‘सस्पेन्स’
पुणे : पुणे शहर लोकसभा मतदार संघावरील दावा अजून सोडलेला नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुणे भेटीत केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील पुण्याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बोलणी नुकतीच झाली. त्यात पुण्यावरील हक्क राष्ट्रवादी काँग्रेसने सोडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. काँग्रेस पक्षाच्या गोटातही उत्साहाचे वातावरण पसरले .परंतु अजित पवार यांनी सांगून टाकले की पुण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील.
अजित पवार यांच्या विधानाने काँग्रेसमध्ये हालचाली थंडावल्या आहेत. काँग्रेस पक्षात उमेदवाराचा शोध चालू असतानाच एकदम राजकारण खुंटले. पुणे शहर काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक जाळे विणलेले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी जागा सोडावीच लागेल असे काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्याने सांगितले.