धुळे । चार महिन्यांपूर्वी नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाण यांच्या सुटकेची बातमी कळताच बोरविहीर गावात आनंदाचे वातावरण आहे. ह्या आनंदाच्या क्षणाला ग्रामवासियांनी डीजेच्या आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोष करून साजरा केला. 22 वर्षीय जवान चंदू चव्हाण नजरचुकीने पूंछ (जम्मू-काश्मीर) सेक्टरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेला. हा प्रकार 29 सप्टेंबर 2016 ला त्याच्या बोरविहीरमधील कुटुंबियांना कळाला. त्या धक्क्याने 29 सप्टेंबरलाच जवान चंदू चव्हाण यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (वय 60) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तर तेंव्हापासून गावात दुखाचे सावट पसरले होते.
सरकार आणि ना.भामरे यांचे प्रयत्न आले कामी
आपल्या भावाची सुखरूप सुटका झाली याचा मला खूप आनंद झाला आहे. भारत सरकार आणि खास करून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे आपण मनःपूर्वक आभार मानतो. भारत सरकारने चंदूच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न आम्ही स्वतः पाहिले आणि अनुभवले आहे. यामुळे अधिकाधिक देशाभिमान जागा झाला, अशी प्रतिक्रिया भूषण याने व्यक्त केली. चंदू कधी घरी येतो असे झाले आहे. त्याची सुखरुप सुटका केली यामागे भारत सरकार आणि भामरे यांचा मोठा प्रयत्न होता.
भाऊ भूषणने दिली आनंदाची बातमी
चंदूचा ताबा घेण्यासाठी सर्व सरकारी सोपस्कार पार पाडण्यात येतील, अशी माहिती भामरे यांनी स्वतः मोबाईलवरून दिल्याचे चंदूचा भाऊ भूषण यांनी सांगितले. चंदू चव्हाणची सुटका झाल्याची माहिती भूषण चव्हाण याने आपले आजोबा चिंधा पाटील आणि ग्रामस्थांना दिली. ही वार्ता ऐकून या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्वत्र फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.‘प्रत्यक्षात चंदू गावात आलेला नाही, तो भारतात प्रवेश करण्यासाठी वाघा सीमेवर आहे, असे भूषण आणि चंदूचे आजोबा चिंधा धोंडू पाटील यांना घरासमोर जमलेल्या ग्रामस्थांना सांगावे लागले. चौकाचौकात सुरु झालेले संगीत, नृत्य व जल्लोष असे वातावरण झाले होते. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेकांनी गावाची वाट धरली होती.
डोळे अश्रूंनी डबडबले
पाकिस्तानने चार महिन्यांनी चंदू चव्हाणची सुटका केली. आपला मुलगा मायदेशी परतला आहे, हे कळताच चंदू चव्हाणच्या आजोबांनी इतके दिवस डोळ्यांत साठवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या, त्याच्या नातेवाईकांच्या, शेजार्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले होते. आपला चंदू परत आला आहे, असे म्हणून आज आख्ख्या गावात जल्लोष करण्यात आला. त्याच्या सुटकेची बातमी समजताच कुटुंबासह संपूर्ण गावाने आनंदोत्सवच साजरा केला. देशाभिमान जागृत करणारी गाणी आणि नृत्य तसेच मिठाई वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.