मुंबई । मुंबईत पुन्हा एकदा आग लागण्याची मोठी घटना समोर आली. यावेळी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मंडाले भागातील भंगाराच्या अनधिकृत गोदमांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि 10 वॉटर टँकर ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. या गोदमांमध्ये प्लायवूड, कपड्याच्या चिंध्या, प्लास्टिक आणि ऑईल होते. सुरुवातीला एका गोदमाला लागलेली आग पसरत गेली आणि 10 ते 12 गोदाम या आगीच्या कचाट्यात सापडले. त्यामुळे अनधिकृत गोदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीवर पाण्याचे फवारे मारण्यात येत होते. मात्र, आग वाढतच होती. त्यामुळे हवेत सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, ही आग बाजूलाच असलेल्या झोपडपट्टीपर्यंत पोहोचणार नाही, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अक्षरशः शर्थीचे प्रयत्न केले.
आग पहाटेच्या सुमारास लागल्यामुळे काही जण आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सुदैवाने जीवितहानीचे कोणतेही वृत्त हाती आले नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न बराच काळ सुरू होते. रविवारी सकाळी ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाचे 12 फायर इंजिन आणि 8 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार ही लेव्हल 4 ची आग होती. मानखुर्दच्या भंगार मार्केटमध्ये हे दुकान आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे.
महापालिकेवर दोषारोप
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. शनिवारी वांद्रेमध्ये अशाच प्रकारे बांधकाम सुरू असलेल्या रूस्तुमजी सीजन इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली होती. बांधकामासाठी वापरण्यात येणारे लाकूड पेटल्यामुळे ही आग लागली होती. दरम्यान, या ठिकाणी बेकायदा गोदाम सर्रासपणे सुरू होते. मात्र, महापालिकेला याची कल्पनाही नव्हती. अशा प्रकारे मुंबईती शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी झोपडपट्ट्या असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा वस्ती दाटीवाटीने उभी राहिलेली असते. त्यातच छोटेछोटे कारखाने बेकायदा सुरू करण्यात येत असतात, त्यांची गोदामेही छोटी आणि कोणतेही सुरक्षेचे नियम अमलात न आणता उभारलेले असतात. अशा बांधकांमावर महापालिकाकडून का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.