सत्तेत असलेल्या भाजपला राजकारणात मजबूत ठेवणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या निधर्मवादी विचारसरणीच्या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ओवेसीबंधु आणि त्यांचे समर्थक काम करत आहेत, हे वेळोवेळी दिसून आले. अन्यथा, निव्वळ भावनिक मुद्द्यावर जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे काम या नेत्यांनी कधीच केले नसते. हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाची जी खेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी खेळली व आपला पक्ष मजबूत केला, तो सत्तेपर्यंत नेला. त्याच धर्तीवर हे ओवेसीबंधु काम करत आहेत. स्व. ठाकरे यांनी स्वतःचे मजबूत राजकारण केले; इथे तर ओवेसीबंधु भाजपसारख्या पक्षाला राजकीय ताकद देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या भाजपच्या मोहिमेत म्हणूनच या बंधुंचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 33 वर्षांपूर्वी भाजपचे संसदेत केवळ दोन खासदार होते. हिंदू आणि मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न या पक्षाने अनेकवेळा केला. राम मंदिर निर्माणाचा मुद्दाही वापरला; परंतु तरीही त्यांना सत्तासुंदरी हस्तगत करता आली नाही. जेव्हा ओवेसीबंधुंनी काँग्रेसपासून मुस्लीम मतदार वेगळे केले तेव्हाच त्यांना सत्तेचा सोपान अगदी सहजतेने चढता आला. आज देशातील 18 राज्यांत भाजप सत्तेत आहे, केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण बहुमत आहे. चोहीबाजूने एकहाती सत्ता असतानाही देशाच्या विकासाचे काय? देशासमोरील प्रश्नांचे काय? मुलभूत प्रश्न तर सुटले नाहीत; परंतु ते अधिक जटील मात्र बनले आहेत. नोटाबंदीचा तडकाफडकी निर्णय घेऊन सरकारने काय हासील केले; काहीच नाही. परंतु, देशाचा आर्थिक विकासदर वेगाने खाली आला. पाहाता पाहाता जीएसटी (वस्तू व सेवाकर)ही लागू केला. कारकायदे कठोर केले, तरीही देशातील काळा पैसा बाहेर आला नाही, तशा वल्गना मात्र या सरकारने वारेमाप केल्या होत्या. 125 लोकांचे बळी घेऊन लागू केलेल्या नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. देशवासी महागाई, बेरोजगारी, बोकाळलेली गुन्हेगारी यांचा सामना करत आहेत. शेजारी राष्ट्रांसोबतच्या परराष्ट्रनीतीमुळे चीन आणि पाकिस्तान सीमेवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. डोकलाम क्षेत्रात तर कोणत्याहीक्षणी युद्ध भडकू शकते, असे चित्र आहे. चीनसोबत युद्ध झाले तर आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. डोकलाममधून सैन्य मागे घेतले तर मोदींच्या प्रतिमेला बट्टा लागेल, आणि नाही घेतले तर चीन युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. काश्मीरखोर्यात दहशतवाद थैमान घालत आहे. तेथील तरुण हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत, आणि आझादी मागत आहेत. दुसरीकडे, सरकारनेच निर्माण केलेल्या आर्थिक दहशतवादाने उद्योगपती, कार्पोरेट जगत एवढेच नव्हे तर छोटे-मोठे व्यापारी यांचेही आर्थिक कंबरडे मोडले गेले आहे. चोहीकडे आर्थिक मरगळ दिसत असताना प्रत्येक क्षेत्रात बॅकफूटवर गेलेल्या सरकारबद्दल जनमत फारसे अनुकूल नाही. या सरकारवर स्मार्टफोनच्या आहारी गेलेला युवावर्गही आता खुश नाही. याच युवांच्या जोरावर मोदींना सत्तेची वाट सोपी झाली होती. नोकरदारही खुश नाही, शेतकरीही सरकारला शिव्या-शाप देत आहेत. संतप्त लोकभावनेला वेगळे वळण देण्यासाठी आधी गोसंरक्षणाचा भावनिक मुद्दा उकरून झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी कथित गोसंरक्षक उदयास आले. त्यांनी कायदा हातात घेऊन अल्पसंख्यांक आणि दलितांवर हल्ले चढवले, आजही हे हल्ले सुरुच आहे. या गोरक्षकांच्या हल्ल्यात मुस्लीम युवकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही मुस्लीम समाजाने संयम पाळला. गोरक्षणाच्या नावाखाली धार्मिक उन्माद सहन करण्याची वेळ मुस्लीमांवर आली असताना, त्यांना वंदेमातरम् म्हणण्याची सक्तीही करण्याचे ठरवलेले दिसते. भाजप अन् रा. स्व. संघाकडून लादली जात असलेली ही सक्ती दुसरे-तिसरे काहीच नसून, मुस्लीमांच्या एकेश्वरवादावर केलेला हल्ला आहे. मुस्लीम हे एकेश्वरवादी आहेत. अल्लाह म्हणजे ईश्वर एकच आहे, अन्य दुसरा ईश्वर असू शकत नाही, ही त्यांची धार्मिक भावना आहे. हिंदूसारखे कथित तेहतीस कोटी देव त्यांच्या धर्मात नाही. मूर्तीपूजा ते निषिद्ध मानतात. दगडांना देव मानून ते दगडासमोर झुकत नाहीत. प्राचीन अद्वैत तत्वज्ञानासारखे काहीसे त्यांचे धार्मिक तत्वज्ञान आहे. त्यामुळेच वंदे मातरम् म्हणजे कथित भारतमाता या देवीला ते वंदन करण्यास नकार देत आहेत. या राष्ट्राबद्दल त्यांच्या मनात आदर आहेच; पराकोटीचे राष्ट्रप्रेमही आहे, तसे नसते तर देशाच्या स्वातंत्र्यात त्यांनी प्राणाच्या आहुत्या सोडल्या नसत्या. देशाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला नसता. संरक्षण, नियोजन, आर्थिक विकास, शिक्षण यासह सर्वच क्षेत्रात हिंदूंइतकेच त्यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे मुस्लीमांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका घेणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आणि, हा मूर्खपणा भाजप अन् रा. स्व. संघाचे अनुयाची करत आहेत. वंदेमातरम्सारख्या निरर्थक मुद्द्यांवर विरोधाची भाषा बोलून ओवेसीबंधु, त्यांच्या पक्षाचे आमदार आणि आ. अबू आझमीसारखे नेतेही भाजप अन् संघाला साथ देत आहेत. जगातील कोणताही देश ठाम धोरणे, देशाच्या प्रगतीची तीव्र आस्था आणि वर्षानुवर्षे अखंड प्रयत्न केल्याशिवाय मोठा होत नसतो. सर्वच मोठी राष्ट्रे ही अशाच प्रमाणिक प्रयत्नांतून मोठी झाली आहेत. भारताला नैसर्गिक व ऐतिहासिक देणगी असतानाही अशाप्रकारच्या निव्वळ धार्मिक विद्वेषामुळे या देशाच्या प्रगतीला खीळ बसली. कोणत्याही सजिवाच्या नैसर्गिक वाढीला जसे प्रगती म्हणता येणार नाही, तद्वतच देशाच्या नैसर्गिक वाढीलाही प्रगती म्हणता येणार नाही. मोदींच्या सत्ताकाळात जी काही प्रगती दिसते, ती नैसर्गिक आहे. त्यात मोदींचे योगदान आहे तरी काय? देशासमोर निर्माण झालेल्या समस्या वगळता या सरकारच्या कामगिरीचे मूल्यांकन सकारात्मक करावे, असेही काहीच नाही.
आज दुर्देव असे आहे, की कोणत्याही गुणवत्तेत न बसणारे नेतृत्व या देशाला लाभले, आणि त्यांना सर्वप्रकारचे जातीयवादी साथ देत आहेत. धर्मनिरपेक्ष विचारांची माणसे षंढ होऊन बसली आहेत. नोकरदार, व्यापार्यांना लाच आणि खोटी आमिषे देऊन सत्तेवर आलेली ही मंडळी सतत फसव्या, गोंडस शब्दांचा प्रचार-प्रसार करून खोट्या प्रगतीचा ढोल बडवत आहेत. हा ढोल बडवणे सुरु असतानाच जनमत थोडे जरी विरोधात गेले, काही निर्णय अंगलट आले की, ते भावनिक मुद्द्यांचा बाऊ करून देशात जातीय अन् धार्मिक द्वेष निर्माण करतात व आपली सत्ता शाबूत ठेवतात. वंदे मातरम्वरून निर्माण झालेला वाद हा अगदी निरर्थक आणि हेतुपुरस्सर निर्माण झालेला आहे. जन-गण-मन म्हणायला कधीच विरोध न करणारे मुस्लीम याच राष्ट्रगानबद्दल आक्षेप का घेतात? भारतमातेला वंदन करण्यास मुस्लीम समाजाने कधीच विरोध केला नाही. परंतु, भारता माता म्हणून तुम्ही जी देवीची मूर्ती उभी करत आहात, त्यानिमित्ताने एकेश्वरवादाला हेतुपुरस्सर धक्का पोहोचवत आहात, त्याच मुद्द्याला मुस्लीमांचा विरोध आहे. मूर्तीपूजेला विरोध असणारे केवळ मुस्लीमच नाही तर इतर अनेकांचाही वंदे मातरम्ला विरोध असू शकतो. ‘हिंदुस्थान की समस्यांए‘ या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका भाषणाचा गोषवारा वाचण्यात आला होता. ते म्हणाले होते, ज्या देशातील जनतेच्या आधाराने आपण जगतो, वाढतो व स्वतःची उन्नती करून घेतो, त्या देशाला आपल्या आयु÷ष्यात मातेइतकेच महत्वाचे स्थान आहे. वंदन करणे म्हणजे कृतज्ञता, आदर व्यक्त करणे होय. त्यामुळे वंदन हे धर्मबाह्य वर्तन आहे असे कुठलाही धर्म म्हणत नाही. नेहरूंच्या या मुद्द्याला कुठल्याही मुस्लीमांचा विरोध नाही. त्यांचा विरोध हा फक्त भाजप अन् त्यांची पितृसंस्था रा. स्व. संघाकडून एकेश्वरवादाच्या तत्त्वाला पोहोचविला जात असलेला धक्का याच मुद्द्याला आहे. म्हणून कुठलाही खरा मुसलमान वंदे मातरम् म्हणणार नाही, असे ही मंडळी सांगत आहेत, अन् त्यात वावगे काहीच नाही. म्हणून, त्यांना बळजबरी करण्याचा प्रयत्नही सत्ताधारीवर्गाने करू नये. मूलभूत प्रश्नांना बगल देऊन भावनिक राजकारण करण्याच्या या प्रयत्नांमुळे समाजात संघर्षाची बीजे रोवली जातात, त्यामुळे समाजव्यवस्था धोक्यात येते, हे सरकारने भानावर येऊन लक्षात ठेवावे. तद्वतच अशा मुद्द्यांना फुंकर घालणार्या मुस्लीम नेत्यांनीही ही बाब लक्षात ठेवावी! लोकशाहीत बहुमताचे राजकारण अपेक्षित असते; पण बहुमताऐवजी बहुसंख्यांकांचे राजकारण होऊ लागते तेव्हा सामाजिक धु्रवीकरण अटळ असते. सध्या त्याच दिशेने राजकारण सुरू आहे!
पुरुषोत्तम सांगळे – 8087861982