पुन्हा ‘नकुशी’ ठरली हुशार!

0

इयत्ता दहावीचा निकाल प्रसारमाध्यमांच्या समोर जाहीर करताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनाही या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे सांगताना अभिमान वाटत होता. इयत्ता 12वीच्या निकालातही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक होते. दरवर्षी इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर होत असतो, त्यात मुलामुलींच्या उत्तीर्ण टक्केवारीचाही उल्लेेख असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून या आकडेवारीत एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या वाढत आहे. त्यामुळे हल्ली या निकालांच्या बातम्यांमध्ये ‘पहिला कोण आला’ यापेक्षा ‘मुली सर्वाधिक उत्तीर्ण झाल्या’ ही बातमी प्रमुख होऊ लागली आहे. बोर्डाचे अध्यक्ष म्हामणे यांना इयत्ता 10वीच्या निकालाचे विश्‍लेषण करत असताना पाहिले तेव्हा काही महिन्यांपूर्वीचे वृत्त आवर्जून आठवले. राज्याच्या आरोग्य विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यात मुलींच्या जन्मदराच्या प्रमाणात मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्के घट झाल्याचे म्हटले आहे. 2015 या वर्षात महाराष्ट्रात 1 हजार मुलांमागे 907 मुली होत्या, पण 2016 या वर्षात मुलींची संख्या 899 वर आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. थोर समाजसुधारकांची परंपरा आणि त्यांच्या उदात्त विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे दर्शवणारा तो धक्कादायक अहवाल होता.

मुलाला वंशाचा ‘दिवा’ समजून मुलीला ‘नकुशी’ समजण्याची बुरसटलेली मानसिकता महाराष्ट्रात अजून मूळ धरून आहे. यावर त्या अहवालाने शिक्कामोर्तब केले होते. म्हणूनच परळी येथील डॉ. सदाम आणि सरस्वती मुंडे, त्यानंतर सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे अशा अनेक कसायांची खाटीकखाने राज्यात चालू असतात. जे बेकायदा गर्भलिंग चाचणी करून मुलींच्या गर्भाची कत्तल करतात. असे कसाई राज्यात आजही ठिकठिकाणी लपलेले आहेत. त्यांच्याकडून ‘मुलगी नको’ म्हणणारे पालक गर्भ परिपूर्ण तयार झालेला असतानाही त्याला पोटात ठार करतात. डॉ. मुंडे हा ते गर्भ कुत्र्यांना खाऊ घालायचा, डॉ. खिद्रापुरे ते गर्भ जमिनीत पुरायचा. पुरोगामी महाराष्ट्राने हे भयाण वास्तव अनुभवले आहे. त्यामुळे मुलींना शिकवणार्‍या सावित्रीबाईंना शेणाचे गोळे फेकून मारले गेले तो काळ आणि मुलगी नको म्हणून तिची पोटातच हत्या करणे, हा सध्याचा काळ यांमध्ये काहीच फरक दिसत नाही. महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या जसा होता तसाच राहिला का, असा भास व्हावा, अशा या घटना आहेत. या निकृष्ट दर्जाच्या मानसिकतेला संपवण्यासाठी आजचा इयत्ता दहावीचा निकाल पुरेसा बोलका आहे. राज्याचा इयत्ता दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला. ज्यात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 86.51 टक्के आहे, तर मुलींचे तब्बल 91.46 टक्के इतके आहे. यावरून ‘नकुशी’ म्हणून नाकारणार्‍या पालकांसाठी मुलींची ही शैक्षणिक प्रगती सणसणीत चपराक आहे. आजही ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी मुलेमुली असतात. मात्र, पालकवर्गाचे नेहमीच मुलाच्या बाजूने झुकते माप असते. शैक्षणिक सुविधा पुरवण्यापासून ते खाण्याच्या पदार्थांची विभागणी करण्यापर्यंत पालकवर्गांकडून नेहमीच मुलींना सापत्न वागणूक दिली जाते. काही घरांमध्ये मुले स्वैराचारी झालेले दिसतात, आयुष्यातील महत्त्वाचा अभ्यासाचा अमूल्य वेळ मनमौजीपणे वागण्यात वाया घालवतात. मात्र, त्याच वेळी मुली मात्र घरातील कामांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत उरलेला वेळ अभ्यासासाठी देत असतात. कमी अधिक प्रमाणात असे वातावरण बहुतांश मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये दिसत असते. ही मानसिकता मुलींचे भावविश्‍व संपुष्टात आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

मुलींचा सर्वांगीण विकास न होण्यामागे पालकवर्गामधील मुलामुलींमध्ये भेदभाव करण्याची वृत्ती कारणीभूत असते. पालकवर्गाकडून आपल्याला अशी वागणूक दिली जात आहे, हे कळत असूनसुद्धा मुली ‘त्या’ वर्तनाला क्षमा करून कुटुंबाचा अविभाज्य भाग बनत असतात. याच मुली आज राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत असताना दिसत आहेत. कायद्याने जरी मुलामुलींमध्ये भेदभाव केला जाऊ नये, म्हणून विविध कायदे बनवले जात असले, तरी घराघरांमधील हा भेदभाव कमी करण्यासाठी कायदे उपयोगाचे ठरत नाहीत, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहेे. भारतात मुली आज लढाऊ विमाने चालवत आहेत, बॉर्डरवर त्यांची नियुक्ती करण्याचा विचार संरक्षण खाते करत आहे. कोणतेही क्षेत्र आज मुलींसाठी वर्ज्य राहिले नाही. उद्या देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा काढण्याचा निर्णय झाला, तर स्त्रीशक्तीचा यात वाटा सिंहाचा असेल. बँक, विमा, रुग्णालय, शिक्षण अशा सेवा क्षेत्रांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची फलनिष्पत्ती अधिक दिसते. देशाच्या विकासासाठी स्त्रियांचा सहभाग एक मोठे मापदंड ठरत आहे. दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलींच्या पालकांनी त्यांच्या मुलींना पुढे अधिकाधिक शिकवावे, हा त्यांचा खरा सन्मान ठरेल.