पुन्हा परप्रांतीयांचा मुद्दा

0

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात परप्रांतीय मतदार हे अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावत असतात. विशेष करून विधानसभा आणि लोकसभेत याचा खूप मोठा परिणाम दिसून येत असतो. आजवर साधारणपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष तर अलीकडच्या काळात एमआयएमसारख्या पक्षांनी परप्रांतीयांचे लांगूलचालन करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येते. शिवसेना पहिल्यापासून उत्तर भारतीयांच्या विरुद्ध भूमिका घेत आलेली आहे, तर युतीधर्मामुळे भाजपदेखील आधी सहसा या वादात पडत नसे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये परप्रांतीयांचा व त्यातही उत्तर भारतीयांचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेकडून हिसकून घेतला आहे, तर युतीधर्मामुळे आजवर या विषयावर फारसे भाष्य न करणारे भाजप नेतेदेखील आता यावर बोलू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर भारतीयांवर स्तुतिसुमने उधळल्यामुळे हा वादग्रस्त मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांच्या योगदानाबाबतचा गौरव करताना वापरलेली भाषाशैली ही मुद्दाम उपयोगात आणल्याचे दिसून येत आहे. विशेष करून मुंबई व महाराष्ट्राला महान करण्यास उत्तर भारतीयांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांचे वक्तव्य वादाला आमंत्रण देणारे ठरले आहे. घाटकोपर रेल्वेस्थानकासमोरील चौकाचे शिक्षण महर्षी आय. डी. सिंह यांच्या नावाने नामकरण करण्यात भाजपनेच पुढाकार घेतला असून, या कार्यक्रमातच फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचे गुणगान केले आहे. मुळातच अजून निवडणुकांना वेळ असताना मुख्यमंत्र्यांना उत्तर भारतीयांची जाहीर पाठराखण करण्याचे काही एक कारण नव्हते. तथापि, अलीकडच्या काही घटनांमधून माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या बाजूने मैदानात उडी घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. यामुळे सध्या तरी उत्तर भारतीयांचे एकमेव तारणहार हे संजय निरूपम आणि अर्थातच त्यांचा काँग्रेस पक्ष असल्याचे चित्र वरकरणी तयार झाले आहे, तर दुसर्‍या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत या वादातील दुसर्‍या धु्रवावरील आपली बाजू मजबूत केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, भाजपदेखील उत्तर भारतीयांसोबत असल्याचे दर्शवण्यासाठी फडणवीस यांनी चतुराईने योग्य वेळ पाहत त्यांच्या बाजूने वक्तव्य केल्याची बाब उघड आहे. अर्थात यातून त्यांनी निरूपम आणि काँग्रेसच्या हातातील मुद्दा हिसकावून घेण्याची तरतूद केली आहे, तर दुसरीकडे साहजिकच मनसेने याचा जोरदार प्रतिकार केला असून, शिवसेनाही मैदानात उतरली आहे. या बाबींचा विचार करता फडणवीस यांचे वक्तव्य हे विद्यमान स्थितीचा लाभ घेण्यासाठीच असल्याचे दिसून येत आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत परप्रांतीयांची मते भाजपच्या पारड्यात गेली होती. विशेष करून उत्तर भारतीय आणि गुजराती मंडळीने हिरिरीने भाजपला मतदान केले होते. यामुळे मुंबईत काँग्रेसला लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र, निरूपमांची वाढती लोकप्रियता भाजपसाठी अडचणीची ठरू नये यासाठीचा हा आटापिटा असल्याचेही अधोरेखित झाले आहे,

तर दुसरीकडे या वक्तव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मित्रपक्ष असणार्‍या शिवसेनेलाही चांगलेच खिजवले आहे. पण यातही हुशारी दिसून येतेय. मुळातच परप्रांतीयांबाबत मनसे आक्रमक असून, शिवसेना तुलनेत मवाळ दिसत आहे. यामुळे आता फडणवीसांचे वक्तव्य हे शिवसेनेच्याही फायद्याचे ठरू शकते. येत्या काही दिवसांमध्ये नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष हे सरकारला कात्रीत पकडण्याची शक्यता आहे. यात शिवसेनाच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास अन्य मुद्दे आपसूकच मागे पडू शकतात. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वाद सुरू झाले असले, तरी याला अनेक कंगोरेदेखील आहेत हे निश्‍चित. मात्र, यातील खरी मेख ही पतपेढीच्या मजबूतीकरणाचीच आहे. मुंबईत आधीपासून काँग्रेस पक्ष हा परप्रांतीयांचे लांगूलचालन करत आला आहे. या पक्षाची आजवरची मुंबईतील सूत्रे ही अमराठी मंडळीच्याच हातात असतात. आता याचाच कित्ता भारतीय जनता पक्ष गिरवत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केलेला आरोप हा समर्पक असाच आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार दोन भाषांमध्ये वाद असता कामा नये वा त्यात भेदही असू नये. मात्र, सर्वांसाठी समान संधी आणि तुष्टीकरण याच्यातील फरक समजून घेण्याची आवश्यकता आहे. नाही तर आधी जे काम काँग्रेस करत होते तेच भाजप करणार असेल तर या दोन पक्षांमध्ये फरक नाही असेच मानावे लागेल. यानंतर मनसेने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य पुनर्रचनेच्या मिमांसेवरील भाष्याचा आधार घेत सोशल मीडियात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही या वादात अप्रत्यक्ष का होईना उडी घेतली आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्‍नावरून त्यांनी आधीच मनसेच्या विरुद्ध भूमिका घेतली होती. पुणे येथे ‘एनडीए’च्या दीक्षांत समारंभात बोलतांना त्यांनी पुन्हा या वादाला खतपाणी घातले. प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी मनसेने मात्र एक मत गमावले असल्याचे थेट सांगून आगीत तेल ओतले आहे. म्हणजेच त्यांनी पुन्हा एकदा फेरीवाले, निरूपम आणि अर्थातच मुख्यमंत्री फडणवीस यांची बाजू घेतली आहे. अर्थात या मुद्द्यावरून प्रत्येक जण आपापल्या मतपेढीचा विचार करताना दिसत असून, यामुळे मराठी समाजातील दुहीदेखील अधोरेखित झाली आहे.