कल्याण । महापालिकेत सामील करण्यात आलेल्या 27 गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला असून, आता पाणीप्रश्नी या गावामध्ये राडे सुरू झाले आहेत. पाण्यावरून डोंबिवलीतील भोपर येथे भाजप पदाधिकार्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला ठोशा बुक्क्याने मारहाण केली असून, याबाबत मानपाडा पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डोंबिवलीनजीक असलेल्या भोपर गावात पाणीप्रश्न गंभीर बनला असून, या गावातील पाणीटंचाईमुळे पालिका प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. यात शिवसेना कार्यकर्तेदेखील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खासदार आमदारांकडे पाठपुरावा करत असून, याचा राग मनात धरून भाजप पदाधिकारी संदीप माळी यांनी आपल्याला ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप सेना कार्यकर्ते रमेश पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच संदीप माळी आणि त्यांच्या भावाने येथील शिवसेना पदाधिकारी रवींद्र पाटील यांना जबर मारहाण करत जखमी केले होते. या रवींद्र पाटील यांना सहकार्य करतो म्हणून संदीप माळी आणि मुकेश पाटील यांनी शिवसेना कार्यकर्ते रमेश पाटील यांना सागाव येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन ठोशा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे मानपाडा पोलिसांनी या अदखल पात्र गुन्ह्यात नमूद केले आहे.
भोपर गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी रमेश पाटील हे खासदार, आमदारांकडे पाठपुरावा करत आहेत. काही दिवसांपूर्वी संदीप माळी आणि त्यांच्या भावाने मारहाण केलेल्या सेना पदाधिकारी रवींद्र पाटील यांनादेखील सहकार्य करत आहेत. हा राग मनात ठेवून भाजप पदाधिकारी संदीप माळी याने मंगळवारी सकाळी सागाव येथील रमेश पाटील यांचे कार्यालय गाठत त्यांना तू रवींद्र पाटील यांना सहकार्य का करतो, असा सवाल करत मारहाण केली. या मारहाणीमुळे रमेश पाटील यांच्या डोळ्यानजीक गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा डोळा थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी संदीप माळी आणि मुकेश पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते रमेश पाटील यांनी आपल्याला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.