अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून डॉन दाऊदच्या नावाने धमक्या दिल्या होत्या, असे आता पोलिस तपासामध्ये समोर आले आहे. मागील सोमवारी रात्री ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदिप शर्मा यांनी या प्रकरणी कारवाई केली. खंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची कसून चौकशी सुरू असून भारतात मोदी सरकार आल्यानंतर दाऊदने आतापर्यंत पाकिस्तानात चार घरे बदलली, अशी महत्त्वाची माहिती त्याने चौकशीत दिल्याचे कळते. आपला फोन टॅप होईल या भीतीने दाऊदने गेल्या तीन वर्षांपासून भारतात फोन केलेला नाही. दाऊदला पाकिस्तानात कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असेही इक्बालने सांगितले बिल्डरांकडून खंडणी उकळल्याच्या तक्रारींवरून इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेनंतर खंडणीखोरीचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून चौकशीत दाऊदबद्दलही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. दाऊद कुटुंबाच्या संपर्कात आहे का?, त्याचा मुंबईत संपर्क असतो का?, तुझं दाऊदशी शेवटचं कधी बोलणं झालं?, दाऊद सध्या कुठे राहत आहे?, दाऊदची पाकिस्तानात किती मालमत्ता आहे?, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांकडून इक्बालवर झाली. त्यावर दाऊद आजही आम्हा कुटुंबीयांच्या संपर्कात आहे, अशी कबुली इक्बालने चौकशीत दिली.
ठाणे पोलिसांनी केलेली कारवाई महत्वाची असून यामध्ये दाऊदचा सहभाग आहे का? तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा असलेला सहभाग आणि त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये पैसे गुंतवले आहेत का? या विषयी ठाणे पोलिस आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. कासकर याच्यासह अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. ठाणे शहरातील एका प्रतिष्ठीत बांधकाम व्यवसायिकाने 2013 मध्ये घोडबंदर रोड परिसरात इमारत बांधण्यासाठी जागा मालकाकडून जमिनीचा विकास करारनामा करून जमीन घेतली होती. त्या जमीन मालकास जमिनीचा संपुर्ण मोबदला धनादेशाव्दारे देण्यात आला होता. सर्व परवानग्या घेऊन या ठिकाणी बांधकामाला सुरूवात झाली होती त्यावेळी काही जमीन मालकांना हाताशी धरून ही जमीन इक्बाल कासकर याने घेतल्याचे सांगून जमिनीचे सेटलमेंट करण्याकरता बिल्डरकडे चार फ्लॅट व 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. ही मागणी पुर्ण न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच खंडणीसाठी इक्बालच्या हस्तकांनी या बांधकाम व्यवसायिकाच्या बांधकामाच्या ठिकाणी तसेच कार्यालयात येऊन धमकावले होते. ठाण्यातील या व्यवसायिकाला इक्बाल कासकर याने थेट फोन करून धमकी दिली होती. डॉन दाऊदचे नाव सांगून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर घाबरलेल्या बांधकाम व्यवसायिकाने त्याला चार फ्लॅट आणि 30 लाख रुपये देण्याचे कबुल केले. येथील एक फ्लॅट बाजार भावाप्रमाणे 5 कोटी रुपये किंमतीचा होता; त्यानुसार चार फ्लॅट पैकी एक फ्लॅट कासकरच्या हस्तकाच्या नावे नोंदवण्यात आला होता. तर तीन फ्लॅट विकून उरलेली रक्कम खंडणी स्वरूपात त्याने स्विकारली होती. यापुढे ठाण्यातील जमिनींचे व्यवहार इक्बाल कासकर सांगेल त्या प्रमाणे कर नाही तर ठार मारले जाईल, अशी धमकी दिली होती. अखेर या विकासकाने खंडणीविरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी कासारवडली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दाउदचा भाऊ इक्बाल कासकरला त्यांच्या दोन साथिदारांसह नागपाडा, मुंबई येथून ताब्यात घेतले. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील व्यापारी आणि बांधकाम व्यवसायिकांनाही धमकावल्याची माहिती समोर आली. ठाण्यात काही वर्षांपूर्वी एका बिल्डरने खंडणीच्या मागणीमुळे आत्महत्या केली होती. बांधकाम व्यावसायिकाला ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बालला अटक केल्यामुळे अंडर्वल्डमधील घडामोडींवर पोलिसांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दाऊदचे भारतातील हस्तक सक्रीय झाल्याचे दिसते. अंडर्वल्डमधील गुन्हेगारीचा फटका डॉक्टर, बांधकाम व्यवसायिक, ज्वेलर्स, उद्योगपती, राजकारणी यांना बसत आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाने केलेली कारवाई योग्य असून या प्रकरणातील काही संशयितांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्तींवर अंकुश राहिल. देवी दुर्गामातेने जसे दुष्ट राक्षसांचे निर्दालन करून जनतेला सुखी केले, त्याप्रमाणे पोलिसांनी समाजातील वाईट व दुष्ट शक्तींना नेस्तनाबूत करावे आणि जनतेला सुखी ठेवावे, ही सदिच्छा !
मुच्छड होता पाकिटमार
दाऊद इब्राहिम कासकर. अंडरवर्ल्ड मध्ये टोपण त्याचे नाव मुच्छड असे आहे. मुंबईतल्या डोंगरी परिसरात दाऊद आपले बालपण जगला. पहिल्यांदा रस्त्यावरील एका व्यक्तीच्या हातातून पैसे चौरून तो पसार झाला. मग पुढे किरकोळ चोर्या, गळ्यातील दागिने चोरणे, मारामारी, खिशातील पाकिटे चोरायला लागला. हळूहळू दाऊदने स्वत:ची टोळी सुरू केली. त्यानंतर करीम लालासोबत मिळून तो छोटे मोठे गुन्हे करू लागला. पण नंतरच्या काळात दाऊदने त्याचा भाऊ सब्बीरसोबत तस्करीचे काम सुरू केले आणि त्यानंतर तो करीम लाला गँगचा शत्रू झाला. 1975 मध्ये दाऊदने हाजी मस्तानसोबत हातमिळवणी केली. हळूहळू तो हाजी मस्तानचा खास माणूस झाला
दाऊदचे पाकिस्तानात हे आहेत नऊ पत्ते
-कराची शहरात क्लिफटनमध्ये अब्दुल्ला शाह गाजीच्या दर्ग्याजवळ
-कराचीतील डिफेंन्स हाऊसिंग एरियातील पाचव्या फेजमधील 6/अ – ख्याबान तंजीम
-इस्लामाबादपासून वीस किलोमीटर अंतरावर इस्लामाबाद मुरी रोडवर भोभान डोंगरावर आयएसआयचा एक सेफ हाऊस आहे.
-इस्लामाबादच्या मारगाला रोडची गल्ली क्रमांक 22 मधील 29 क्रमांकाचे घर
-कराचीत आमिर खान रस्त्यावरील ब्लॉक क्रमांक 7-8 च्या सीपी बाजार सोसायटीत 17 क्रमांकाचे घर
-कराचीत ऊक- अॅक्टेशनचे फेज 5 मधील 30 वी गल्ली
-कराचीतील अब्दुल्ला शाह गाजी साब यांच्या मजारीजवळ
-कराचीचे क्लिफटनमध्ये तलवार एरियातील परदेसी हाऊस-3 जवळ महेरान चौकातील आठवा मजला
-कराची नुरियाबाद डोंगरातील पॅलेशियल बंगला
– अमोल देशपांडे
वृत्त समन्वयक, जनशक्ति, मुंबई
9987967102