पुरंदर जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवा

0

सूरज मांढरे यांची सूचना

जेजुरी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी अचानक जेजुरी नजीकच्या नाझरे जलाशयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुरंदर तालुक्यातील सर्वच जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

सूरज मांढरे यांनी मंगळवारी पुरंदर पंचायत समीतीला भेट दिली. यावेळी पुरंदर तालुक्यातील टंचाईचा आढावा घेतला. त्याचबरोबर तालुक्यातील धरणातील पाण्याचा आढावा घेतला. आढावा बैठक उरकून त्यांनी थेट जेजुरी नजीकच्या नाझरे जलाशयाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे व अन्य अधिकारी होते. पुढील आठ ते दहा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वच पातळीवरून नियोजन करावे. तालुक्यातील सर्वच जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबधित विभागाचे अधिकारी, यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने एक समिती तयार करावी. त्यासाठी स्थानिक पोलिसांची ही मदत घ्यावी. समितीच्या माध्यमातून पाणी राखून त्याचे योग्य नियोजन करून पुरवठा करावा, असे सूरज मांढरे यांनी अधिकार्‍यांना सांगितले.