पुरनाड फाट्यावर जुगार अड्डयावर धाड : 15 जुगार्यांना अटक
साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त : जळगावातील पथकाने कारवाई करताच खळबळ
मुक्ताईनगर : तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळील रावसाहेब हॉटेलच्या मागे अवैधरीत्या सुरू असलेल्या पत्ता जुगाराच्या अड्ड्यावर जळगावच्या सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकासह मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकून साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करीत 15 जुगारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 6 जून सोमवार रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास करण्यात आली.
अत्यंत गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक शंकर शेळके व पोलिस पथकाने सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळील रावसाहेब हॉटेलमागे असलेल्या अवैधरीत्या सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर धाड टाकली. यावेळी झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याने पोलिसांनी जुगार्यांच्या ताब्यातून एक लाख 70 हजार 220 रुपयांच्या रोकडसह तीन चारचाकी, दोन दुचाकी, 13 स्मार्टफोन, पत्त्यांच्या कॅटसह अन्य जुगाराचे साहित्य मिळून 13 लाख 52 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्थानकाच्या पथकाने संजय गजमल मराठे, (39, पूर्णाड), गजानन भिमराव सोनवणे, (59, मुक्ताईनगर), संतोष नथ्थू खुरपडे (33, मुक्ताईनगर), कैलास वासुदेव जाधव, (38, वडोदा, ता.मुक्ताईनगर), विजय नारायण परगरमोर (42, शेगाव, जि.बुलडाणा), मोहम्मद आसीफ मोहम्मद ताहीर, (37, शेगाव), रवींद्र सदाशीव शिरोडकर (वडोदा, ता.मुक्ताईनगर), मोहम्मद मोहसीन खान (40, शेगाव), गजानन मनोहर शंखे (40, शेगाव), महादेव धनसिंग राठोड (41, कान्हेरी गवळी, ता. बाळापूर, जि.अकोला), सीताराम प्रल्हाद पारसकर (52, भोटा, ता.नांदुरा, जि.बुलडाणा), अनिल नामदेव कोळी (50, टहाकळी), राजेश सीताराम वाकोडे (50, नांदुरा), सुरेश रामदास लोखंडे (29, वडोदा), जितेंद्र सुभाष पाटील (विटवा, ता. रावेर) या संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिस नाईक विकास नायसे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.