चोरट्या वाहतुकीसह अधिकार्यांच्या संगनमतीचा निषेध ; मधल्या रस्त्याने वाहतूक बंद करण्याचे आश्वासन
मुक्ताईनगर- तालुक्यातील पुरनाड येथील सीमा शुल्क नाक्यावर चोरटी वाहतूक व संबंधित अधिकार्यांच्या संगनमताने शासनाच्या लाखो रुपयांच्या करचुकवेगिरी विरोधात शनिवार, 27 ऑक्टोबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले.
आरटीओ अधिकार्यांना घेराव घालत निदर्शने
शिवसेनेने आंदोलना दरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पुरनाड येथील सीमा शुल्क तपासणी नाक्यावर एमबीसी पीएनएल या खाजगी कंपनीचा अवजड वाहन वजन काटा करण्याचा कंत्राट दिला असून सदरील कंपनीचे भ्रष्ट अधिकारी आणि प्रादेशिक परीवहन विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने तपासणी नाका चुकवून ओव्हरलोड वाहने वजन काटा तपासणी नाक्यावरीलच मधल्या मार्गाने व पुरनाड गाव ते अंतुर्ली अशा चोरट्या मार्गाने तोतया आरटीओ मार्फत पैसे घेवून काटा न करताच सोडले जातात त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. प्रादेशिक परीवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांचा आणि एमबीसी पीएनएल अधिकार्यांच्या संगनमताने स्वतःचा आर्थिक विकास करणे सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता दोघांकरवी उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात यासाठी वारंवार निवेदने देवूनही संबधीतांची मग्रुरी कमी होताना दिसून आलेली नाही व चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरुच आहे. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक होत पुरनाड सीमा शुल्क तपासणी नाक्यावर अधिकार्यांना घेराव घालीत निदर्शने आंदोलन केले .
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गोपाळ सोनवणे, तालुकाप्रमुख छोटु भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, मुशीर मणियार, सलीम खान, जाफर अली, जहीर भाई सुपडू खाटीक, फय्याज भाई उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेश टोंगे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, युवासेना ता.प्र.सचिन पाटील, अमरदीप पाटील, प्रफुल्ल पाटिल, राजेंद्र तळेले, संतोष माळी, गजानन पाटील, भास्कर पाटील, निलेश महाजन, श्रीकांत पाटील, राजू पाटील, अजाबराव पाटील , प्रशांत पाटील , भागवत कोळी, संभाजी पाटील यांचेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
तपासणी नाक्यावरील मधल्या रस्त्यातून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक सायंकाळपर्यंत बंद करण्याचे लेखी आश्वासन व वाहतूक झिकझॅक पद्धतीने करून मधल्या रस्त्याने प्रवासी वाहतूक, मोटारसायकली व शाळकरी व शेती साहित्य वाहने सोडली जातील, असे पत्र प्रादेशिक परीवहन विभागाचे अधिकारी प्रवीण सर्जेराव यांनी स्वाक्षरीनिशी दिल्याने शिवसेनेने सुरू असलेले आंदोलन थांबवले.