पुराच्या पाण्यात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

0

नांदेड – नायगावपासून जवळ असलेल्या मांजरमजवळ नदीला आलेल्या पुरात तवेरा गाडी वाहून गेली आहे. यात बरबडा येथील एका दाम्पत्याचा चिमुकलीसह मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या घटनेत मांजरम येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटना २० ऑगस्टच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडल्या आहेत.

मांजरम गावात तवेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. गाडीमध्ये असणाऱ्या बाबूशा दिवटे, पारुबाई दिवटे, अनुसया दिवटे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशीरा गावकऱ्यांच्या मदतीने गाडी आणि त्यातील तिघांना बाहेर काढण्यात आले.

दुसऱ्या घटनेत मांजरम येथीलच विनायक गायकवाड हा तरुण रुग्णालयात असलेल्या बहिणीला जेवणाचा डब्बा पोहोचवून मांजरमकडे बेंद्री मार्गे येत असताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात मोटारसायकलसह वाहून गेला. रात्री उशिरा बेंद्री शिवारात विनायक गायकवाड यांचा मृतदेह सापडला. दरम्यान, वाहून गेलेल्या चारही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत.