स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला मोठ्या प्रमाणात निवडून आल्या आहेत. विधिमंडळात आणि संसदेत महिलांना आरक्षण ठेवण्याबाबतचा विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. राजकारणात महिलांचे प्रमाण वाढले आहे. स्त्रिया राजकारणात वा समाजकारणात दिसल्या म्हणजे त्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या असंच मानलं जात होतं. किंबहुना राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होता. स्त्रीमुक्ती चळवळीतल्या कार्यकर्त्यांबाबत आक्षेप घेतला जायचा. स्त्रीमुक्ती चळवळ कुटुंबसंस्था उदध्वस्त करणारी आहे, या समजुती कशा पसरल्या कुणास ठाऊक? पण पसरल्या होत्या हे मात्र निश्चित! स्त्रीमुक्ती चळवळ महिलांमध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत करण्यासाठी, आहे.
आत्मसन्मानाची भावना पुरुषांमध्ये आहे आणि स्त्रीमध्ये जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे. भारतीय पुरुषाला गुलामी प्रिय आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत, असं मानण्याइतपत त्यांचं मानसिक अध:पतन झाले आहे.
मध्यंतरी एका महिलेने झाशीच्या राणीच्या नवर्याबद्धल गोडसे भटजींच्या माझा प्रवासमध्ये असलेल्या काही गोष्टी एका लेखात मांडल्या होत्या. झाशीच्या राणीचा नवरा गंगाधरपंत स्त्रीवेष करत असे. या पुस्तकातच आपण असे का वागतो, याची गंगाधरपंतांना वाटणारी जीवघेणी खंतही व्यक्त केली आहे. आपण अशाप्रकारे स्त्रीवेष करून स्त्रीसारखे वावरता हे खरे का? असा प्रश्न या गंगाधरपंतांना करण्यात आला. ते फार महत्वाचे आहे. मी तर लहानसा मांडलिक आहे. परंतु इंग्रज बहाद्दरांपुढे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर देशात जितके राजे-रजवाडे आहेत, तितक्यांनी तुम्हापुढे बांगड्याच भरल्या आहेत. कोणी शूर तुम्हापुढे नाही. बांगड्या भरल्याच नाहीत असा पुरुष पृथ्वीवर नाही. तुम्ही दिपांतरीचे असता आपल्या पराक्रमाने आमच्या द्वीपात येऊन आम्हास कैद केले, म्हणजे इंग्रजांच्या पराक्रमापुढे सगळ्याच मोठमोठ्या पुरुषांनी बांगड्या भरून हार खाल्ली. तर माझ्यासारख्या छोट्याशा राजाने स्त्री वेष करून वावरायचे ठरवले, तर त्यात गैर काय? असा प्रश्न गंगाधरपंतांनी उपस्थित केला. आत्मसन्मान विसरून लाचारीचे, अवहेलनेचे जीवन जगणारे, अन्याय सहन करत जगणारे हजारो पुरुषसिंह आपल्या अवतीभोवती असताना इथे फक्त स्त्रीमुक्तीचाच विचार व्हावा हे कितपत योग्य आहे?
विभावरी शिरूरकर यांच्या साहित्यावर पुण्या-मुंबईत साठ सत्तर वर्षांपूर्वी मोठ्या जोरदार चर्चा, वादविवाद होत, असं माझ्या वाचनात आलं आहे. त्या काळात एका स्त्रीने आपल्या सर्वगुणसंपन्न नवर्याचं नाक कापण्यासाठी काय केले होते, हे ऐकलं, तर आजच्या कैक पुरोगामी पुंगवांनाही फेफरे येईल. ही गोष्ट कुण्या ऐर्या गैर्याने सांगितलेली नाही. निस्पृह या टोपण नावाने तेव्हा लिखाण करणार्या दत्तो अप्पाजी उर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी ही पुणे संस्कृती सादर केली होती. दाजीसाहेबांनी लिहिले होते, आपला नवरा व्यभिचारी आहे, बाहेरच्या बायांस आपल्या घरी आणून आपल्या देखत तो त्यांच्याशी हैदोसधुल्ला घालीत असतो, या रागावर पुण्याच्या एका सुखवस्तू, श्रीमंत गृहस्थाच्या पत्नीने घरासमोरच त्यांच्या नाकावर टिच्चून वेश्या व्यवसायाचे दुकान उघडले होते! स्त्रीमुक्तीची ही एवढी जबरदस्त धडक सत्तर वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका स्त्रीने दिली होती हे कुणाला खरे तरी वाटेल का? उनाडपणे वागणार्या पुरुषांना ताळ्यावर आणण्यासाठी काय करावे, हा प्रश्न स्त्रियांना नेहमीच सतावत आला आहे.
विभावरी शिरूरकरांनी आपल्या साहित्यातून हा प्रश्न उभा केला आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात सुशिक्षित पांढरपेशा वर्गात वादळच निर्माण केले होते. पतीने टाकून दिलेल्या स्त्रीने काय करावं, याबद्दल त्या काळातल्या विद्वानांनी जे काही विचार व्यक्त केले आहेत, ते आज वाचताना मोठी मौज वाटते. आता घटस्फोटाचा कायदा झालाय. स्त्रीला नवर्याच्या जाचाला कंटाळून मुक्त करून घेण्याची इच्छा असेल, तर घटस्फोट घेऊ शकते अथवा घटस्फोट नाकारून नवर्याला धडाही शिकवू शकते. पण सत्तर वर्षांपूर्वी हे शक्य कोटीतले नव्हते. पुरुष त्याला हवं तसं वागत होता. पण स्त्रीला मात्र असे वागणे शक्य होत नव्हते.
समाजसुधारक श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या परिस्थितीवर लिहिताना उनाड स्त्रियांशी संबंध तोडून टाकण्याचे तोडगे पुरुषांनी काढलेले आहेत. त्याच पद्धतीचा अवलंब स्त्रियांनी करावा असे स्पष्टपणे सुचवले होते. घटस्फोटाचा विधी मी पाहिला नाही पण काशीला झालेला मी ऐकला आहे.
खुद्द बिथोर येथे पेशव्यांच्या घराण्यामध्ये एक उनाड स्त्री निघाली आणि नवर्यास टाकून अन्य पुरुषासोबत राहू लागली. तेव्हा त्या स्त्रीशी संबंध नाहीसा करण्यासाठी घटस्फोटाचा विधी केला होता, असे ऐकतो. या विधीची एकंदर योजना मला परिचित नाही. त्या विधीचे वर्णन संस्कारज्ञ ब्राह्मणांकडून न मिळता सामान्य मनुष्याकडून मिळाले. नदीच्या काठी हा विधी झाला. स्त्रीच्या डोक्यासारखे रूप मडक्याला दिले होते आणि नदीच्या काठी जाऊन दगडावर ते मडके आपटले. तिथे उपस्थित सर्वांनी शिमग्यातल्याप्रमाणे शंखनाद केला आणि नवर्याने काही दिवस सुतक धरलं या सगळ्यापासून आपण खूप पुढे आलो आहोत. पण नव्या काळात नवे प्रश्न, नवी बंधने, नवे जाच निर्माण झालेच आहेत. स्त्रीमुक्तीसुद्धा बुरसटलेली वाटू लागलीय कित्येक जणींना!
हरीश केंची- 9422310609