रन भुसावळ रन ; सेल्फि पॉईंट आकर्षण ; जलबचतीचाही संदेश
भुसावळ- निरामय व सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेत सर्वच जाती-धर्माच्या नागरीकांनी एकत्र येत सहभाग दर्शवत जातीय सलोख्याचे दर्शन घडवले. एरव्ही चौका-चौकात वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या भुसावळकारांनी स्पर्धेच्या कालावधीत अतिशय सौजन्याची भूमिका दाखवत पोलिसांच्या कुठल्याही मदतीविनाच स्वयंशिस्त पाळल्याने स्पर्धकांना अंतर पार करताना कुठलाही अडथळा आला नाही शिवाय शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे स्पर्धकांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले तसेच नागरीकांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
विशाल कुंभार व अश्विनी काटोले विजेता
दहा, पाच व तीन किलोमीटर अशा तीन गटात घेण्यात आलेल्या रनर स्पर्धेत 10 किलोमीटर पुरूष गटातून विशाल कुंभार हे विजेते ठरले. कुंभार यांनी गतवर्षीदेखील याच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता हेदेखील विशेष तर द्वितीय- सुरेश वाघ, तृतीय- सार्थक पाटील. महिलांमध्ये प्रथम- अश्विनी कटोले, द्वितीय- कांचन राठोड, तृतीय- दीपा बाविस्कर आल्या. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक, रोख रक्कम देवून गौरवण्यात आले.
सेल्फि पॉईंट आकर्षण
यंदा स्पर्धेसाठी विशेष करून सेल्फि पॉईंटचे आकर्षण राहिले. त्यात लव्ह भुसावळच्या प्रतिकृतीसभोवती उभे राहून अनेकांनी सेल्फि काढले शिवाय छोटा भीमसोबत सेल्फि काढण्यात आल्या. स्पर्धेदरम्यान ‘जल सुरक्षित, जीवन सुरक्षित’ या स्लोगनआधारे पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेशही देण्यात आला.