जळगाव– दूध फेडरेशनजवळ असलेल्या राजमालती नगरात बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पुर्व वैमनस्यातून सात जणांनी एकाच कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुरूवारी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राजमालती नगरातील अजय गोकूळ गायकवाड याचे त्याच्या गल्लीतील काही तरूणांशी पुर्वीपासून वाद होते. बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर गोलू बालू सामुद्रे, बालू सामुद्रे, बंटी गौतम निकम, गौतम निकम, पुरूषोत्तम सैंदाणे यांचा मुलगा (नाव माहीत नाही), आकाश पंढरीनाथ सपकाळे हे अजयला काठ्यांनी मारहाण करीत होते. घराजवळ भानगडी सुरू असल्याचे लक्षात आल्यावर अजयचा भाऊ संतोष, शांताराम आणि त्यांचे कुटुंबीय काय वाद सुरू आहे? हे बघण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना अजय याला मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यांनी मारहाण करणार्यांना थांबविले. मात्र त्यांनी संतोष त्यांची पत्नी आणि शांताराम यांनाही बेदम मारहाण केली. दरम्यान, बालु सामुद्रे व पुरषोत्तम शेंदाने यांच्या मुलांनी संतोष यांच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने मारहाण करून डोके फोडले तर शांताराम यालाही डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. यानंतर रात्री चौघाही जखमींना कुटूंबियांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मारहाण प्रकरणी संतोष गायकवाड यांनी गुरूवारी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे