‘पुलं’ माझे दैवत, तर त्यांचे साहित्य म्हणजे संजीवनी – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

0

पुलोत्सवात चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : विनोद सादर करण्यामागच्या जडणघडणीत पुलंच्या साहित्य अन्य कलाकृतींचा मोठा वाटा आहे. पुलंच्या अनेक पुस्तकांचा खजिना माझ्या घरी आहे. पुलंचा विनोद हा शाब्दिक नाही, तर तो बिटवीन द लाईन्स असतो. पुलं हे माझे दैवत, तर त्यांचे साहित्य संजीवनी आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि ‘स्क्वेअर 1’च्या सहयोगाने आयोजित पुलोतत्सवात अर्काइव्ह थिएटर येथे सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शांताराम फौंडेशनचे किरण व्ही. शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, आशयचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार उपस्थित होते. पुलोत्सवास बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र साहित्य परिषद, व्ही. शांताराम फाउंडेशन, अ. भा. मराठी नाट्य परिषद, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

अशोक सराफ म्हणाले, महाराष्ट्राला संजीवनी स्वरूपात योगदान देणारी दोन व्यक्तिमत्वे म्हणजे पुलं आणि लता मंगेशकर. पुलंच्या विनोदात प्रत्येकवेळी आपल्याला नवीन अर्थ गवसतात. सध्याच्या काळातील विनोद आणि ते सादर करण्याची पद्धत अंगावर काटा आणणारी आहे. या क्षेत्रात काम करणार्‍यांनी आणि नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांनी पुलंच्या बहुआयामी विनोदी शैलीचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या पुस्तकांच्या वाचनाची पारायणे केली पाहिजेत. तसेच पुलंच्या स्मृती चिरकाळ टिकविण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रास्ताविक चित्राव यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले, तर जकातदार यांनी आभार मानले. पुलोत्सवानिमित्त सुरू झालेल्या चित्रपट महोत्सवात रविवारी रसिकांनी ‘फूल और कलियाँ’, ‘द इन्स्पेक्टर जनरल’, ‘गुळाचा गणपती’, ’द बॅरेटस् ऑफ विंपोल स्ट्रीट’ या चित्रपटांचा आस्वाद घेतला.