कल्याण ता. 13(प्रतिनिधी , सुनिल इंगळे)पुलवामा सारखी घटना ही देशाच्या पटलावरील अत्यंत निंदनीय घटना आहे. पुन्हा यासारखी घटना घडू नये यासाठी देशाचे सरकार, सैनिक, गुप्तचर संघटना कटिबद्ध आहेत; नव्हे तर दहशतवादाची काळी बाजू पाहता जनतेने सतर्क असले पाहिजे,हेच पुलवामा कादंबरी सांगते. तसेच ही कादंबरी राष्ट्रवादीचा संदेश देते, असे प्रतिपादन भारतीय साहित्य अकादमीचे सदस्य व साहित्यिक डॉ. नरेंद्र पाठक यांनी कल्याण येथे केले.
अखिल भारतीय साहित्य परिषद आणि बी के बिर्ला महाविद्यालयाचा हिंदी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुलवामा कादंबरीवरील परिसंवादात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला स्वतःचा विकास करायचा असेल तर या दहशतवादी कारवाया त्यांनी बंद केल्या पाहिजेत. भारताला विकासापासून कोणीही रोखू शकत नाही हे शेजारी राष्ट्रांनी लक्षात घ्यावे. बऱ्याच वर्षांनी दहशतवादावर पुलवामा सारखी दर्जेदार कादंबरी उदयास आली आहे. यासाठी लेखक डाॅ. चंद्रशेखर भारती यांचे अभिनंदन करतो. राॅ सारख्या गुप्तहेर संघटनेचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ही कादंबरी अधोरेखित करते. ही कादंबरी हिंदी आणि इंग्रजीत आली पाहिजे आणि भारतभर गेली पाहिजे,असेही पाठक सर म्हणाले.
राजीव जोशी म्हणाले की, पुलवामा कादंबरी वाचकाला खेळवून ठेवते. कादंबरीतील काही प्रसंग, पाठलाग, अंगावर शहारे आणतात.हे कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी उत्कंठावर्धक झाली आहे. समकाळाला भेडसावणा-या विषयाला तसेच देशाला आणि सर्व जगाला व्यापून असणारा धार्मिक उच्छाद व दहशतवाद या विषयाला लेखकाने हात घातला हे कौतुकास्पद आहे.
प्रवीण देशमुख म्हणाले की, राॅ सारखी संघटना दहशतवादी कारवायांचा कसा मुकाबला करते, हे कल्पनेने व काही संदर्भ घेत लेखकाने ओघवत्या भाषेत मांडले आहे. याप्रसंगी बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महादेव यादव, हिंदी विभाग प्रमुख डॉ. बालकवी सुरंजे ,भाजपाचे राज्य उपाध्यक्ष श्री अनिल बोरनारे, डॉ. शामसुंदर पांडे ,मराठी अध्यापक संघाचे अनंत किनगे , वृतपत्र लेखक संघाचे सुनिल इंगळे हे उपस्थित होते. शुभांगी भोसले यांनी सुंदररित्या सूत्रसंचालन केले●