पुलवाम्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

0

पुलवामा: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्रालच्या जंगलात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ४२ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत. जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. आज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. दरम्यान आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शाह काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार असून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल चर्चा करणार आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांची सुद्धा ते भेट घेतील.