पुलाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

0

राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले उद्घाटन, भाजपने दुसर्‍यादिवशी पूल केला बंद

पिंपरी-चिंचवड : हॅरीस पुलास बांधण्यात आलेल्या समांतर पुलाचे उद्घाटन विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने केले. मात्र, लगेच दुसर्‍यादिवशी रविवारी सत्ताधारी भाजपाने पूल वाहतुकीसाठी बंद केला. या उद्घाटनावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. पुल पूर्ण होवून अनेक दिवस उलटले तरी केवळ पालकमंत्र्यांना वेळ नसल्याने उद्घाटन रेंगाळत ठेवून भाजपाने करदात्या हजारो नागरिकांना वाहतूक कोंडीत लोटले आहे. यामुळे आम्हीच उद्घाटन करून पुल वाहतुकीस खुला केला, असे म्हणणे राष्ट्रवादीचे आहे. तर अद्याप पुलाचे काही काम अपूर्ण असल्याने अधिकृतरित्या उद्घाटन करून पुल खुला करू शकत नसल्याचा खुलासा सत्ताधार्‍यांनी केला आहे. विरोधकांना हाती काही कामच शिल्लक नाही. त्यामुळे ते अशी उद्घाटने करत फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दापोडीतील कोंडी टाळण्यासाठी पुल
दापोडी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरीस पुलाला समांतर पूल बांधण्याचे काम 2016 मध्ये हाती घेतले होते. या पुलाचे काम पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपरीकडून पुण्याला जाणा-या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले असून पालकमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी(दि.16) ईद च्या मुहुर्तावर हा पूल नागरिकांसाठी खुला केला होता. परंतु, त्याच्या दुसर्‍या दिवशी सत्ताधार्‍यांनी लगेच तो पूल बंद केला. यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

हॅरीस पुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, सत्ताधार्‍यांना उद्घाटन करण्यासाठी वेळ नसल्याने पुलाचे उद्घाटन केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. भाजपचे नेते शहराकडे दुर्लक्ष करत आहेत. सत्ताधार्‍यांकडून विनाकारण लोकांना वेठीस धरले जात आहे. मंत्र्यांच्या वेळेची वाट न पाहता हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला करेल. तसेच ऍम्पाय एस्टेट येथील पुलाचे काम पूर्ण झाले नसताना खुला केला.
-दत्ता साने, विरोधी पक्षनेता

हॅरीस पुलाचे काम अर्धवट आहे. चार ते पाच दिवसाचे काम शिल्लक आहे. त्यानंतर पुलाचे उद्घाटन केले जाईल. विरोधकांना आत्ता काहीच काम राहिले नाही. त्यामुळेच ते अशी उद्घाटने करत आहेत. त्यांची अगोदर उद्घाटने करण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यांना ’प्रोटोकॉल’ कळत नाही.
-एकनाथ पवार, सभागृह नेता