पुलावरील भराव वाहून गेल्याने बससेवा बंद

0

चोपडा। तालुक्यातील मजरे हिंगोणे व मौजे हिंगोणे या गावांना चोपडहून जाणार्‍या रस्त्यावर दोन नाले लागतात त्यावर बांधलेल्या फारशी पुलाच्या लागतचा भराव वाहून गेल्याने तीन दिवसांपासून या गावात एसटी बस बंद असल्याने विद्यार्थी, महिला व जेष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. 7 रोजी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने याभागास चांगलेच झोडपले यामुळे अकुलखेडा फाटा ते मौजे हिंगोणे पर्यंत जाणार्‍या रस्त्यावरील दोन्ही नाल्याचे फरशी पुलाजवळील मातीचा भराव वाहून गेल्याने या मार्गाने लासुर येथे जाणारी बस बंद झाल्याने मौजे हिंगोणे व मजरे हिंगोणे या दोनही गावांना बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

वर्षभरापूर्वी तुटलेले पूल दुरुस्त झालेच नाही
मजरे हिंगोणे गावचे दोन्ही पूल गेल्यावर्षी आलेल्या अतिवृष्टीत वाहून गेले होते त्याच्या पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पार दुर्लक्ष केल्यामुळे अद्यापही या गावामध्ये जाण्यासाठी धड रस्ता नाही गावातून वाहणार्‍या सांडपाण्याच्या चिखलातूनच पायी प्रवेश गावात करावा लागतो चारचाकी या गावात जाऊ शकत नाही तरी शासनाने थंड बसत्यात टाकलेले पुलाचे काम तात्काळ सुरू करावे यंदा तरी पुलावरून गावात जाण्यासाठी सोय नागरिकांना उपलब्ध होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना त्रास
काही शाळा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्यात तर काही विद्यार्थ्यांनी सुटीच्या काळात कॉम्प्युटर क्लास, 10वी, 12वी असलेल्या विद्यार्थ्यांचे क्लास सुरू आहेत गेल्या तीन दिवसांपासून एसटी बस बंद असल्याने त्यांचे नुकसान होत आहे.

सदर काम हे नाबार्ड 2 या योजनेत टाकलेले आहे यास शासनाने लवकरात लवकर या पुलांचे बांधकाम मंजूर करून मजरे हिंगोणे गावाचा प्रश्न सोडवावा
सरपंच नंदकिशोर सांगोरे मजरे हिंगोणे

रस्ता झाला चिखलाचा
आठवड्याभरापासून काही शाळा व कॉलेज सुरू झाल्याने चोपडा येथे शिक्षणासाठी व क्लासेससाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तसेच हिंगोणे ते अकुलखेडा फाटा असा तीन किलोमीटर रस्ता चिखलामुळे अक्षरशः दोन दिवस पायी चालावा लागला तसेच रिक्षा व्यतिरिक्त कोणतेही चारचाकी वाहन या रस्त्यावरून चालविणे धोक्याचे आहे. गतवर्षी जुलै महिन्यात याच रस्त्याचे असेच हाल झाले होते. तात्पुरता भराव करून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र तोही वाहून गेला.