मुंबई:हॉलिवूडच्या बिग ब्रदर शो नंतर भारतातही बिग बॉस सुरु झाला आणि बघता बघता हा शो प्रत्येक घरात पाहिला जाऊ लागला. बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवरचे अनेक सिझन प्रचंड हिट झाले आहेत. बिग बॉस हिंदीच्या यशानंतर हा कार्यक्रम विविध भाषांत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच मराठी बिग बॉस चा पहिलाच सीजनही खूप गाजला. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद मेघा धाडेला मिळाले तर पुष्कर जोग या कार्यक्रमाचा उपविजेता ठरला.
बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्राम वर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहाताच तो डबिंग स्टुडिओत काढला असल्याचे लगेचच लक्षात येत आहे. त्याने या फोटोसोबत मी परत कामाला लागलो आहे. ती आणि ती या माझ्या चित्रपटासाठी मी नुकतेच चित्रीकरण केले असून पुढील अपडेट तुम्हाला लवकरच देईन असे लिहिले आहे.
पुष्करचा “ती आणि ती” चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुष्कर प्रेक्षकांना लवकरच त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. “ती आणि ती” या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. .