पुष्पकसह मंगला एक्स्प्रेसमधील विक्रेत्यांवर ब्लेडने हल्ला : दोघांना अटक

0

अवैध विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाला आली उशिराने जाग : लागेबांधे असल्यानेच कारवाईला बगल : प्रवाशांचा उघड आरोप

भुसावळ : पुष्पक एक्स्प्रेसच्या पँण्ट्रीकारमधील विक्रेत्यांवर अवैध विक्रेत्यांनी ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा मंगला एक्स्प्रेसमध्येदेखील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने अधिकृत विक्रेत्यांमध्ये भीती पसरली आहे. रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस यंत्रणेचे अवैध विक्रेत्यांशी असलेल्या लागेबांध्यामुळेच त्यांची हिंमत दिवसागणिक वाढत असून चार महिन्यात त्यामुळेच दुसर्‍यांदा ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यानंतर कारवाईचा दंडुका उगारणारी रेल्वे सुरक्षा बलाची यंत्रणा मात्र गाड्यांमधील अनधिकृत विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने डीआरएम प्रशासनाने आता दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर सुस्तावलेल्या रेल्वे सुरक्षा बल यंत्रणेला जाग आली असून त्यांनी अवैध विक्रेत्यांविरुद्ध धरपकड मोहिम सुरू केली असलीतरी कारवाईत सातत्य राखण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी हर्षल सुनील पाटील (21) व सोनू मोहन अवसरमल (22, दोन्ही रा.भारत नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे.

एकाच दिवशी दोन हल्ल्याच्या घटना
मुंबई येथून सुटलेली डाऊन पुष्पक एक्स्प्रेस बुधवारी दुपारी 3.30 वाजता भुसावळ स्थानकावरून सुटल्यानंतर अवैधरीत्या खाद्यपदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांनी गाडीतील पेन्ट्रीकारमधील कर्मचारी विमलेश ठाकूर व चेतराम ठाकूर यांच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार केल्याने दोन्ही विक्रेते जखमी झाले होते तर अवैध विक्रेत्यांनी गाडीची धोक्याची साखळी ओढून पळ काढला होता तर जखमींवर खंडव्यात उपचार करण्यात आले व खंडवा लोहमार्ग पोलिसात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच नाशिककडून येणार्‍या डाऊन मंगला एक्स्प्रेसमध्ये सुध्दा अवैध विक्रेत्यांने भुसावळ स्थानक येण्यापूर्वी आऊटरला गाडी थांबली असतांना अधिकृत विक्रेता विजय तोमर (27) यांच्या चेहर्‍यावर अणकूचीदार वस्तूने हल्ला करीत पळ काढला. या घटनेनंतर भुसावळ स्थानकावर जखमी विक्रेत्यावर उपचार करण्यात आले.

रेल्वे सुरक्षा यंत्रणांचा धाक संपला
रेल्वे सुरक्षा यंत्रणासह लोहमार्ग पोलिसांना अवैधरीत्या खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाईचे अधिकार असलेतरी दरमहा मिळणार्‍या हप्त्यांमुळे कारवाईला बगल दिली जात असल्याचे उघड टिका प्रवासीवर्गातून होत आहे. अप्रिय घटनेनंतर काही दिवस कारवाईचे नाटक सुरू होते मात्र नंतर ‘पुढचे पाढे पंच्चावन्न’ असा एकूणच प्रकार अनुभवास येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुध्दा कुर्ला मंडुवाडी या गाडीत पेन्ट्रीकार मधील कर्मचार्‍यांवर ब्लेडने हल्ला चढविण्यात आल्याने त्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर आता पुन्हा पुष्पक आणि मंगला एक्स्प्रेसमध्ये घटना घडल्याने विक्रेत्यांमध्ये भीीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्या, हल्ल्यानंतर धावत्या गाडीसह रेल्वे स्थानकांवर दिसणार्‍या अवैध विक्रेत्यांना ताब्यात घेतले जात असल्याने अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.