पुसत चालेली ओळख मिळणार

0

अमळनेर शहर तसे रसिक नाट्यवेडे, संगितवेड जोपासणारे म्हणून ओळखले जाते. साहित्य नाटक संगित या कलांमध्ये अमळनेरचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. थोर शास्त्रीय संगित गायक करिमखॉ यांच्या गायन मैफीली या शहरात झाल्या आहेत. श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या रूपाने कलेला उत्तेजन मिळत गेले. नंतरच्या काळात मो. द. ब्रम्हे यांनी संगित नाटकांची परंपरा सुरू ठेवली. सन 70 ते 80 च्या दशकात गावात नाटक मंडळी भरभराटीस होती. श्री मनोहर व सौ. माधुरी भांडारकर, श्री आप्पासो करमरकर यांच्या नाट्य संस्था शिखरावर होत्या.

शहरात पाचपावली नवरात्रोत्सवात पोलिस परेड ग्राऊंडवर नवरात्रीनिमित्त 9 दिवस दर्जेदार नाटकांची मेजवानी असायची. सायंकाळी 6 ते 7 वाजेपासून मित्र मंडळी व कुटुंबियांसह दर्जेदार नाटके खुल्या मैदानात मोफत पहाण्यास मिळत. ज्यांनी ही मजा अनुभवली ते खरोखर भाग्यवान म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थँक्यू मिस्टर ग्लॅड, अश्रुंची झाली. फुले, नटसम्राट, वाहातो हि दुर्वाची जुडी, तो मी नव्हेच या सारख्या गाजलेल्या नाटकांच्या निमित्ताने नटसम्राट प्रभाकर पणशीकर, बाळ कोल्हटकर, सतीष दुभाषी, अविनाश खर्चीकर, रविंद्र पटवर्धन, राजा गोसावी, दिलीप प्रभावळकर अशा थोर नाट्य कलावंतांचे अभिनय दर्शन अमळनेरकरांनी घेतले आहे. सिनेमा व प्रसार माध्यमांचा प्रचार नसतांना नाटक म्हणजे मनोरंजनाचे मुर्तीमंत आणि हृदय स्पर्शी असे साधन होते. खुल्या मैदानात, खुल्या आकाशात हजारोंच्या संख्येने लोक या नाटकांचा आस्वाद घ्यायचे कुठलीही गडबड दंगा मस्ती झाल्याचे आठवत नाही. अमळनेरकरांच्या रसिकतेची स्तुती प्रत्यक्षात नाट्य कलावंत प्रभाकर पणशीकर, बाळ कोल्हटकरांनी तर मी महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग करीत फिरतो पण खुल्या मैदानास इतक्या रसिकतेने व शांतपणे नाट्य-प्रयोग पाहणारे रसिक माझ्या पहाण्यात आले नाहीत. असे म्हणून स्टेजवरून साष्टांग दंडवत घातला होता. नंतरच्या काळात स्थानिक कलाकारांची नाटके झाली. त्यांना चांगली प्रसिद्धी हे आणि नाटकवेड कमी होत गेले. नाटक कंपनी संस्थाही बंद पडल्या त्यांच्या पुनरूज्जीवनाकडे समाजानेही दुर्लक्षच केले आणि नाटकवेडे अमळनेर ही ओळख इतिहास जमा होत गेली. मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक च्या जमान्यातही प्रसार व प्रचार माध्यमांच्या निमित्ताने संपूर्ण जगावरील कुठलेही कला हातातल्या मोबाईलवर दिसु लागली. इडीयट बॉक्स अर्थात टिव्हीचे घराघरात वाढलेले प्रस्थ अशा परिस्थितीतही आजही काही नाट्य रसिकांचे वेड कमी झालेले नसून तो पिंड पुणे, मुंबईच्या नाटकांनी संगित रजनिने व सदोदीत जोपासला गेलाय. म्हणून आजही अनेक कलाकार, विचारवंत, व्याख्याते, गायक, अभ्यासक आपली कला सादर करण्याची संधी दवडत नाही. तेव्हढाच प्रतिसाद नाट्य वेडे म्हणविणारे कलेला खर्‍या अर्थाने दाद देणारे रसिक गर्दी करतात. सन 1994 मध्ये संदीर घोरपडे या रसिकाने शहरात एक नाट्यगृह व्हावे म्हणून अपेक्षा व्यक्त केली.

त्यासाठी ‘मोरया नाट्य संख्या’ स्थापन केली. उद्दीष्ट एकच नृत्य नाट्य, संगित या क्षेत्रात नवनवीन वरूणांना वाव मिळावा, अमळनेरातून देखील कलावंत तयार व्हावे. मात्र त्यांच्यासाठी एक हक्काचे स्टेज असावे म्हणून तत्कालिन लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. सुरेश ललवाणी यांच्या मार्फत मंत्रालयात तेव्हाचे सांस्कृतिक मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला. परंतु नाट्यगृह हे जिल्ह्याच्या ठिकाणीच शासन स्तरावरून अनुदानीत बांधुन मिळते ही आडकाठी आली. मात्र 2004 मध्ये वैशिष्ठेपूर्ण योजनेतुन 100 टक्के सरकारी अनुदानातून इतर राजकारण्यांची शक्ती वापरून अमळनेरकरांना मिळाली. रंग मंचावरील सारे कलाकार विविध कारणांनी विखुरले जावून सांस्कृतिक चळवळ थंडावली गेली असतांना नाट्यगृहाची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होत असलेली उभारणी पाहून रसिकांना पुन्हा उभारी आली. नवनविन तरूण कलाकारांना आता हक्काचे व्यासपीठ मिळेल अशी आस लागली होती. मात्र दहा वर्षाच्या कालखंडात न.पा. व तालुक्याच्या राजकीय पटलावर बदल घडत गेले. त्यातून श्रेया चे राजकारण पुढे आले आणि पुन्हा एकदा नाट्य रसिकांचा हिरमोड झाला. आज नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र ते सर्व सुविधा युक्त वातानुकुलित असावे आसन व्यवस्था इतर सुविधा यासाठी आ. शिरीष चौधरी यांनी आपले प्रयत्न सुरू करून नुकतेच 5 कोटी रूपये शासनाकडून नाट्यगृहासाठी निधी मिळविला आहे. 2004 मध्ये याचा पाया रोवला गेला त्याची खरी निर्मिती एक त्यानंतर म्हणजे 2011 मध्ये अमळनेरकर नाट्य कला रसिकांसाठी एक कलेचे हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही वास्तु उभारली जात आहे. त्याला नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह असे नामकरणााचा पालिकेने सर्वानुमते ठराव केला आहे. 12 वर्षाच्या या नाट्य तपोवनासाठी अनेक राजकीय मंडळींचे देखील योगदान राहिले आहे. त्यात माजी आ. कृषीभुषण साहेबराव पाटील यांचाही मोलाचा वाटा ठरला आहे. जिल्ह्याच्या गावात सोडले तर ग्राम पातळीवर अमळनेर शहरात अतिभव्य सर्व सुविधायुक्त मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेले व लवकरच नाट्य रसिकांसाठी खुले होवू पाहणारे नाट्यगृह शहराच्या सौंदर्यात तर भर घालणारेच ठरणार असून उमद्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या माध्यमातून पालिकेला भाडे स्वरूपात आर्थिक हातभार लागणार असून व्यावसायिक नाट्य संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी नवनवीन नाटकांची मेजवानी रसिकांसाठी खुली होवू शकणार आहे. त्यातून शहराची नाट्य कलावंताची आवड असणार्‍या रसिक श्रोत्यांची नाटकवेडे अमळनेरकर ही पुसत चाललेली इतिहास जमा होवू पाहणारी ओळख पुन्हा एकदा चर्चेत येवू शकणार आहे.

अमोल पाटील
अमळनेर, प्रतिनिधी
-मो. 9623610808