मुक्ताईनगर- शहरातील संत रोहिदास नगरातील एका विद्यार्थिनीने आई-वडिलांनी पुस्तकांना पैसे न दिल्याचा राग आल्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली. वेळीच घरच्यांचा हा प्रकार लक्षात आल्याने प्राथमिक उपचार करून या विद्यार्थिनीस अधिक उपचारार्थ जळगाव येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शहरातील संत रोहिदास नगर मधील रहिवासी असलेले प्रमोद इंगळे यांची कन्या प्राजक्ता ही जगजीवनदास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. शाळेत लागणार्या वह्या व पुस्तकांसाठी पैसे मागूनही घरच्यांनी वेळेवर पैसे न दिल्याने संतापाच्या भरात तिने गळफास लावून घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी घरच्यांचा हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी लागलीच तिला सावरले व उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगरात उपचारार्थ दाखल केले असता प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असून प्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे सांगण्यात आले.