जळगाव । आजकालची पिढी ही खुप भाग्यवान आहे. त्यांना आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध आहे. मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातुन डाऊनलोडींग मोठ्या प्रमाणावर होते. परंतु विद्यार्थ्यांचे वाचन मात्र होत नाही. यासाठी पेपर इंजिनिअर होण्यापेक्षा प्रॅक्टीकल इंजिनिअर होण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहीजे असे मत बाटु विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.जी. गायकर यांनी व्यक्त केले. गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज एकदिवसीय नॅक्टटेस्टम’ या राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परीषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
एक एक शब्द पुस्तकासारखा
सध्याच्या काळात मोठे बदल घडत आहे. विद्यार्थ्यांनी या बदलांच्या अनुषंगाने लक्ष केंद्रीत केले पाहीजे. नॅक्टटेस्टम या परीषदेत उपलब्ध झालेल्या या दिग्गज मान्यवरांचा एक-एक शब्द म्हणजे पुस्तकासारखा असल्याचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. दरम्यान परीषदेत व्हीएनआयटीचे संचालक डॉ.एन.एस. चौधरी यांनी जलप्रदुषण, वाहनांवर लक्ष आणि वेग नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी स्वअनुभव ही यावेळी कथन केले. दरम्यान परीषदेत कुलगुरू डॉ.व्हि.जी. गायकर यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.व्ही.जी. अराजपुरे यांनी केले तर प्रा. हेमंत इंगळे यांनी आभार मानले.
तरूणांचा नोकरीसाठी संघर्ष
कुलगुरू डॉ. गायकर पुढे म्हणाले की, देशात दरवर्षी आठ लाख इंजिनिअर होतात. त्यापैकी 40 टक्के अभियांत्रिकीची पदवी घेणार्यांना नोकरीची संधी उपलब्ध होते तर उर्वरीत 60 टक्के तरूण हे नोकरीसाठी संघर्ष करीत असतात. परंतु केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही तर अभियांत्रिकीची पदवी घेणार्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी औद्योगिक ज्ञानही आवश्यक आहे. औद्यागिक प्रशिक्षण घेऊन स्वत: उद्योजक होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या असा सल्ला त्यांनी दिला. तर माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, देशात उपलब्ध झालेल्या साधनांमुळे मनुष्यबळाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या तरूणांनी आता उद्दीष्टांमध्ये बदल केला पाहीजे असा सल्ला त्यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
परिषदेत माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ, नागपुर व्हीएनआयटीचे संचालक डॉ.एन.एस. चौधरी यांसह गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, प्रा.प्रमोद पेंडसे, डॉ. ब्रिजेश अय्यर, छबी इलेक्ट्रीकल्सचे छबीराज राणे, शासकीय अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बोरकर, प्राचार्य डॉ.व्ही.जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक, प्रा.एम.एस. महाजन, प्रा.व्ही.एच. पाटील, प्रा.व्ही.डी. चौधरी, गोदावरी आयएमआरचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके आदी उपस्थित होते. यावेळी परीषदेत सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले.