भुसावळ- ग्रामीण भागात गावा-गावात शाळा आणि मंदिरांसोबत आता ‘वाचनालयाची ज्ञान मंदिरे’ उभी राहिली पाहिजेत. त्या शिवाय गावाची मानसिक आणि सामाजिक स्थिती बदलणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या हातात चांगली पुस्तके आली आणि वाचून त्यातील ज्ञान मस्तकात गेले तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही, असे विचार प्रा.डॉ.जतिन मेढे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील साकरी येथील ‘खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी आणि स्व.किसन रामदास नेहेते सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी खासदार रक्षा खडसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले .
गुणवत्ता व ज्ञानावर आधारीत शिक्षणाची गरज
प्रा.डॉ.मेढे पुढे म्हणालेत की, काळ झपाटयाने बदलत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. ज्ञानाची स्पर्धा वाढत आहे. अश्या काळात माझ्या खेड्यातील तरूणाने मागे राहून चालणार नाही, त्याने गुणवत्ता व ज्ञानावावर आधारित शिक्षण घेऊन जगाच्या स्पर्धेत उतरले पाहिजे. तसे झाले नाही तर आपलेच भविष्य आपण अंधारात घेऊन जाऊ त्यासाठी जागे व्हा, अज्ञानी, अडाणी आणि बेरोजगार होऊन आपल्या आई-वडिलांची स्वप्न उध्वस्त करू नका, असेही ते म्हणाले. इंडियन नेव्हीत स्पर्धा परीक्षेतून गेलेले कॅप्टन संदीप एस.रायभोळे, अंतर्नादद प्रतिष्ठानचे संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास उपसरपंच भानुदास बाविस्कर, पोलिस पाटील बोदर, सोपान नेहेते, नारायण पाचपांडे, संघरत्न सपकाळे, नारायण कोळी, राहुल महाजन, विलास नेहेते आदींसह मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी, महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी नमो विचार मंचने घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचा निकाल घोषित करून विजेत्या महिलांना व मुलींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक नारायण कोळी तर आभार विलास नेहेते यांनी केले.