पूरनाड टोल नाक्यावर दररोज 12 ते 15 लाखांची अवैध वसुली
माजी मंत्री एकनाथ खडसेंचा आरोप : अधिवेशनात प्रश्न मांडणार
मुक्ताईनगर : खान्देशमधून मध्यप्रदेशात जाण्यासाठी महाराष्ट्रातील पूरनाड आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयांची वसुली केल्या जात असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसेंना केला आहे. आमदार खडसे यांनी रविवारी दुपारी चार वाजता या ठिकाणी तत्काळ भेट देऊन अधिकार्यांची कान उघाडणी केली. या चेक नाक्यावरील प्रकाराबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र-मध्यप्रदेश आरटीओ चेक पोस्ट नाक्याची वरीष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
चेक पोस्ट ठरतोय कमाईचे साधन
पूरनाड चेक पोस्ट हा आरटीओ कर्मचार्यांसाठी दोन नंबरच्या कमाईचे साधन आहे. वाहन चालकांकडून या ठिकाणी वसुली केली जाते. मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेकपोस्ट तर एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणारी वाहनं असतात. अशावेळी त्यांच्याकडे एखादे कागदपत्र कमी असले तर त्यांच्याकडून वसुली केली जाते. ही बाब एकनाथराव खडसे यांना सांगण्यात आल्यानंतर रविवारी दुपारी खडसे हे लगेच चेकपोस्टवर गेले. त्याठिकाणी त्यांनी अधिकार्यांची चांगलीच कान उघाडणी केली. महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या टोल नाक्यावरील वजनकाट्यातही तफावत आढळली असून यावेळी 10 ते 15 ट्रक चालकांकडून माहितीदेखील जाणून घेण्यात आली शिवाय अवैध वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर पंटरही या टोल नाक्यावर कार्यरत असून 10 ते 12 लाखांची दररोज अवैध कमाई होत असल्याचा दावा खडसे यांनी केला.
भ्रष्टाचाराचा वाटा कुणा-कुणाला ?
या नाक्याची चौकशी ही वरीष्ठ पातळीवर झाली पाहिजे. या ठिकाणी किती वसुली केली जाते. त्याचा वाटा कुणाकुणाला मिळतो? यावर वचक कसा बसविता येईल यासाठी आता एकनाथराव खडसे आक्रमक झाले असून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.