मुंबई : बलाढय उत्तर विभागावर आठ विकेट्स राखून सहज मात करत पूर्व विभागाने सय्यद मुश्ताक अली आंतरविभागीय ट्वेन्टी-२० लीगच्या जेतेपदासाठी दावेदारी केली आहे. उत्तर विभागाला प्रग्यान ओझाने तीन बळी मिळवत धक्के दिले आणि त्यांना १५९ धावांवर रोखले. विराट सिंग आणि कर्णधार मनोज तिवारी यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पूर्व विभागाने सहजपणे उत्तर विभागावर मात केली. नाबाद ७५ धावांची धडाकेबाज खेळी साकारत मनोजने आयपीएलसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. विराटने धडाकेबाज फलंदाजी करत ४८ चेंडूंत नाबाद ७४ धावा केल्या.
उत्तर विभागाचा डाव अडचणीत सापडला होता, पण युवराजने २४ चेंडूंत ४ षटकारांच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. त्यानंतर प्रदीप सांगवान (२१) आणि मनन शर्मा (१८) यांनी जलदगतीने धावा करत संघाला दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला. या सामन्यात पूर्व विभागाचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने तीन बळी मिळवत उत्तर विभागाचे कंबरडे मोडले. आव्हानाचा पाठलाग करताना पूर्व विभागाची सुरुवात चांगली झाली नाही. विराट सिंग आणि कर्णधार मनोज तिवारी यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.