पृथ्वीवर राहूनही आम्ही परग्रही

0

भुसावळ। स्त्री- पुरुष जन्माला येणे हि कुणाच्याही हातचे काम नाही ते नैसर्गिक आहे. मात्र याव्यतिरीक्त पुरुष असूनही स्त्री म्हणून जगण्याची इच्छा असते मात्र त्याला समाज स्त्री म्हणून जगू देत नाही, तृतीयपंथी म्हणजे काही अनैसर्गिक आहे, काही गेल्या जन्माचे पापाचे प्रायश्‍चित म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत अशी पुरुषप्रधान समाजाची मानसिकता असून आजही आम्ही पृथ्वीवर राहून परग्रही आहोत कि काय अशी भावना निर्माण झाली असल्याची खंत तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केली. उत्कर्ष कलाविष्कार आयोजित स्व. नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार 2 जुन रोजी श्रीकृष्णचंद्र सभागृहात दिशा पिंकी शेख या बहुपेडी तृतीयपंथीय कवयित्री यांच्याहस्ते करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या समस्या, अपमानास्पद वागणूक, शारीरिक शोषण, शारीरिक अत्याचार या सर्व प्रश्नांना घेवून त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही पार पडला. शंभू पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मंचावर यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, दिलीप पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, सुरेश पाटील, पंडीतराव सुरवाडे, खान्देश नाट्यमहोत्सव केंद्रीय समिती अध्यक्ष मोहन फालक, उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रियंका साळी व सुशिल पाटील यांनी केले, तर प्रास्तविकात अनिल कोष्टी यांनी उत्कर्षच्या नाट्यचळवळीबद्दल आढावा सादर केला. आभार स्वरदा गाडगीळ यांनी मानले.

सुरक्षा हिच आमची जात
आपल्या जीवनात आलेले अनुभव, समाजाकडून झालेली अवहेलना या घटना त्यांनी मुलाखतीतून व्यक्त केल्या. यावेळी दिशा शेख यांनी सांगितले की, आमच्या जात नावाची गोष्ट नाही, भूक हा आमचा धर्म आणि सुरक्षितता हिच जात असल्याचे स्पष्ट केले. आई- वडीलांनी समजून न घेतल्यामुळे आम्हाला संघर्ष करावा लागला, त्यामुळे आज रस्त्यावर जेवढे हात टाळ्या वाजवित आहे. याला जबाबदार केवळ पालक असल्याचे सांगितले. तसेच आई- वडीलांकडून मिळणारी वागणूक व समाजात होणारी अवहेलना यामुळे आत्महत्येचाही प्रयत्न केला असल्याचा खुलासाही दिशा शेख यांनी यावेळी केला.

भिक मागण्याची वेळ
प्राचीन काळापासून धार्मिक लेबल लावून आमचा मनोरंजनासाठी वापर होऊ लागला. पिढ्यान पिढ्या आमच्यावर दैवीकरण लादण्यात आले. मात्र मुघल काळात कर निरीक्षक व जनानखाण्यात सुरक्षा रक्षक म्हणूनही तृतीयपंथीयांना मान मिळाला आहे. मात्र ब्रिटीश राजवटीनंतर आमच्यावर भिक मागण्याची वेळ येऊन ठेपली, समाजात आमच्यासाठी असलेल्या असुरक्षितते मुळे आक्रमक वागावे लागले, आक्रमक वागणे हेच आमचे सुरक्षा कवच असल्याचेही दिशा शेख यांनी आपल्या मुलाखतीद्वारे स्पष्ट केले.