‘पेटीएम’द्वारे मिळकत कर भरण्याची सुविधा

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिक आता मिळकत कर ‘पेटीएम’द्वारे भरु शकणार आहेत. कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी ही सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्वावर एक वर्ष कालावधीसाठी असणार आहे.

सव्वाचार लाख मिळकती
शहरात सव्वाचार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत पालिकेच्या वतीने मिळकरत कर रोख, धनादेश, डीडी आणि ऑनलाईन माध्यमातून स्वीकारला जातो.

प्रायोगिक तत्वावर वर्षभरासाठी सुविधा
आता ’पेटीएम’द्वारे मिळतक कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्वावर एक वर्ष कालावधीसाठी असणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून त्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. या सेवेसाठी पालिका ‘पेटीएम’ला कोणत्याही प्रकारची रक्कम देणार नाही. ‘पेटीएम’वर जमा होणारा कर त्याचदिवशी पालिकेच्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्याचदिवशी जमा न झाल्यास 100 रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे. कर भरणार्‍या नागरिकांकडून ‘पेटीएम’ शुल्क वसूल करणार आहे. नेटबँकिंगसाठी पाच रुपये शुल्क, क्रेडिट कार्डसाठी 0.80 टक्के शुल्क, डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांसाठी 0.50 व 0.75 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे.