‘पेटीएम’द्वारे मिळकत कर भरणास स्थायीची मान्यता

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – शहरातील नागरिक आता मिळकत कर ‘पेटीएम’द्वारे भरु शकणार आहेत. कॅशलेश व्यवहाराला चालना देण्यासाठी पेटीएमद्वारे मिळकत भरुन देण्याची सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमध्ये काम करणार्‍यांची, डिजिटल व्यवहाराला पसंती देणार्‍यांची मोठी सोय झाली आहे. त्यांचा वेळ वाचणार असून फक्त पाच रुपये शुल्कात या सुविधेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

पाच रुपये शुल्क
‘पेटीएम’द्वारे मिळतक कर भरण्याची सुविधा प्रायोगिक तत्वावर एक वर्ष कालावधीसाठी असणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून त्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. या सेवेसाठी पालिका ’पेटीएम’ला कोणत्याही प्रकारचे रक्कम देणार नाही. ‘पेटीएम’वर जमा होणारा कर त्याचदिवशी पालिकेच्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्याचदिवशी जमा न झाल्यास 100 रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे. कर भरणार्‍या नागरिकांकडून ’पेटीएम’ शुल्क वसूल करणार आहे. नेटबँकिंगसाठी पाच रुपये शुल्क, क्रेडिट कार्डसाठी 0.80 टक्के शुल्क, डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांसाठी 0.50 व 0.75 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मान्यता दिली.