पेट्रोलपंप बंद ठेवण्याच्या निर्णयाला मोदी सरकारचा विरोध

0

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून आठवड्यातून एकदा इंधन न वापरून बचत करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पेट्रोलपंप चालकांनी साप्ताहिक सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलपंप चालकांनी घेतलेल्या या निर्णयाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने समाचार घेतला आहे.

पंतप्रधानांनी खनिज तेलाच्या आयातीत थोडी कपात करण्याच्या हेतूने एक दिवस इंधन वापरू नका, असे आवाहन केले आहे. त्यानंतर 14 मेपासून दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय काही राज्यांतील पेट्रोलपंप वितरकांनी घेतला. पण, तेल मंत्रालयाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागेल, असं मोदी सरकारने म्हटले आहे.

इंधनबचत ही वाहनचालकांनी स्वयंस्फुर्तीने करावी, पेट्रोल पंप बंद ठेवणे, हा त्यावरील उपाय नसल्याचे मोदी सरकारने ठणकावून सांगितले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा सोयीस्कर अर्थ काढून ही पेट्रोलपंप सुट्टी घेण्यात आल्याबद्दल पेट्रोलियम वितरकांच्या समुहातूनही चीड व्यक्त झाली होती. तसेच नागरिकांकडूनही विरोध केला जात होता. तामीळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटकाचा काही भाग व मुंबईसह महाराष्ट्राचा काही भाग या क्षेत्रांतील पेट्रोलपंप 14 मेपासून दर रविवारी बंद राहणार आहेत. पेट्रोल व डिझेलवर कमिशन वाढवून मिळावे, यासाठी ही सुट्टी घेण्यात येणार आहे मात्र, पंतप्रधानांच्या आवाहनाचे कारण पुढे करत पेट्रोलपंप चालक रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचे म्हणत आहेत. पेट्रोलपंप रविवारी बंद ठेवण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय पेट्रोलियम वितरक संघटनेनेच विरोध केला आहे. देशात 53 हजार 224 पेट्रोलपंप आहेत. पब्लिक सेक्टरमधील 53 हजार 224 पेट्रोल पंपांपैकी 80 टक्के ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनमध्ये येतात.